Ramdas Kadam : मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातून बंडखोरी करून भाजपशी घरोबा केला आहे. तसेच मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. तेव्हापासून शिवसेनेला गळती लागली आहे. अनेक आजी माजी आमदार, खासदार, नगरसेवक तसे पदाधिकार्यांनी बंडखोरी करत शिंदे गटात सामील झाले आहेत. आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही पक्षाला रामराम केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीच किंमत राहिलेली नाही असे म्हणत कदम यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली खदखद व्यक्त केली आहे. कदम यांनी पत्रात म्हटले आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. परंतु बाळासाहेब यांचे निध झाल्यानंतर नेतेपदाला कुठलीच किंमत राहिलेली नाही. मला आणि माझा मुलगा आमदार योगेश कदम याला सातत्याने अपमानीत करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून सत्तास्थापन करू नये अशी आपण हात जोडून विनंती करण्यात आली होती. तरी ही मागणी उद्धव ठाकरे यांनी धुडकावून लावल्याची सल कदम यांनी व्यक्त केली. तसेच आपल्यावर फार वाईट काळ आला होता. शिवसेना नेत्यांकडून माझ्यावर टीका केली जात होती, परंतु यावर कुठल्याही माध्यमांमध्ये न बोलण्याची ताकीद का देण्यात आली याचे कारण कळालेले नाही असेही कदम यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र ! pic.twitter.com/A5ykJZoDYV — Ramdas Kadam - रामदास कदम (@iramdaskadam) July 18, 2022
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र जसेच्या तसे
प्रति, सन्माननीय श्री.उध्दवजी ठाकरे,
यांस जय महाराष्ट्र!
शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहीली नाही, हे मला पहायला मिळालं.
आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले.
विधानसभेच्या निवडणूकीच्या आधी आपण मला आचानक मातोश्रीत बोलवून घेतले आणि मला आदेश दिलेत की यापुढे तुमच्यावरती कोणही कितीही टिका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मिडीयासमोर अजिबात जायचे नाही. मिडीयासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही, यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही. मागील ३ वर्षे तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करत आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे.
२०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार बनवत होतात त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत संघर्ष केला व हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल, अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही याचेही दु:ख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. आणि म्हणून मी आज "शिवसेना नेता " या पदाचा राजीनामा देत आहे.
आपला
रामदास कदम
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.