Uddhav Thackeray Mumbai: 'राज्यपाल कोश्यारींना कोल्हापुरी जोडे दाखवा', उद्धव ठाकरेंची जहरी टीका

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 30, 2022 | 17:14 IST

uddhav thackerays venomous criticism on governor bhagatsingh koshyari: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे

show kolhapuri chappal to governor bhagatsingh koshyari uddhav thackerays venomous criticism
'कोश्यारींना कोल्हापुरी जोडे दाखवा', ठाकरेंची जहरी टीका 
थोडं पण कामाचं
  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य
  • राज्यपालांवर उद्धव ठाकरेंची जहरी टीका
  • उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर संतापले

Governor: मुंबई: 'कोल्हापुरी वहाण-जोडा देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना कोणीतरी दाखविण्याची गरज आहे. त्याचा अर्थ कोणी कसा लावायचा हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. पण कोल्हापुरी जोडे हे जगप्रसिद्ध आहेत. ते सुद्धा त्यांना दाखविण्याची वेळ आलेली आहे.' अशी जहरी टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे. राज्यपाल कोश्यारींनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली असताना उद्धव ठाकरेंनी देखील 'मातोश्री'वर (Matoshree) तात्काळ पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल कोश्यारींचा खरपूस समाचार घेतला.

पाहा उद्धव ठाकरेंनी नेमकी काय केली टीका

'आजपर्यंत गेल्या दोन-अडीच वर्षात राज्यपाल पदाच्या खुर्चीत जी व्यक्ती बसली आहे. मी राज्यपाल पदाचा अवमान करु इच्छित नाही. याचं कारण राज्यपाल पद हे मोठं आणि मानाचं पद आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रपतींचे ते खास दूत असतात म्हणून मी राज्यपाल पदाचा कुठेही अवमान करु इच्छित नाही. पण एक गोष्ट सत्य असते की, त्या खुर्चीचा मान हा त्या खुर्चीत बसणाऱ्याने सुद्धा राखायला पाहिजे. तो त्या खुर्चीत सध्या बसवल्या गेलेल्या राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी या व्यक्तीने ठेवलेला नाही.' अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

अधिक वाचा: गुजराती आणि राजस्थानींमुळे मुंबई आर्थिक राजधानी - कोश्यारी

'मागील काही वर्षातील त्यांची वक्तव्य असतील हे बघितल्यानंतर खरंच महाराष्ट्राच्या नशिबीच अशी लोकं का येतात? हा प्रश्न पडला आहे. तुम्हाला कल्पना आहे की, मी मुख्यमंत्री असताना लॉकडाऊनसारख्या परिस्थितीमध्ये जेव्हा इतरत्र लोकांचे जीव जात होते. त्यावेळेला सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळं उघडण्याची घाई झाली होती. अर्थात त्यावेळी मी तो विषय तेवढा वाढवला नव्हता. त्यांनी मला दिलेल्या पत्राला मी उत्तर दिलं होतं.' 

'काही दिवसांपूर्वी यांनीच सावित्रीबाई फुले यांच्याबाबत देखील फार हिणकस असे उद्गार काढले. आज महाराष्ट्रात राहून सगळं काही ओरपलेलं आहे म्हणजे अंगत-पंगत सगळा मानमरातब आहे तो ओरबाडलेला आहे. असं असताना महाराष्ट्रातच मराठी माणसाचा अपमान केलेला आहे.' असं म्हणत उद्ध ठाकरेंनी भगतसिंह कोश्यारींबाबत संताप व्यक्त केला आहे.

अधिक वाचा: 'राज्यपाल कोश्यारी अजगरासारखे सुस्त पडलेले असतात...'

'महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, संस्कार आहेत परंपर आहे. महाराष्ट्रात अनेक काही गोष्टी आहेत. महाराष्ट्रात सुंदर लेण्या आहेत. डोंगर, खोरे आहेत. शिवरायांचे गड-किल्ले आहेत. महाराष्ट्राची पैठणी आहे. काही खाद्यपदार्थ आहेत. हे सगळं त्यांनी गेल्या दोन-अडीच वर्षात पाहिलं असेल. म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी पाहिल्या असतील. पण त्यांनी कोल्हापुरी वहाण पाहिली नसेल.' 

अधिक वाचा: वादग्रस्त विधानावर राज्यपाल कोश्यारींचं स्पष्टीकरण

'कोल्हापुरी वहाण-जोडा देखील त्यांना कोणीतरी दाखविण्याची गरज आहे. कारण ते महाराष्ट्राचं एक वैभव आहे. त्याचा अर्थ कोणी कसा लावायचा हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. पण कोल्हापुरी जोडे हे जगप्रसिद्ध आहेत. ते सुद्धा त्यांना दाखविण्याची वेळ आलेली आहे. कारण महाराष्ट्रात साधी-साधी माणसं कशी कष्टानं वर येतात हे दाखविण्यासाठी मी कोल्हापूरचा जोडा म्हणालोय. त्या जोड्याचा बाकी उपयोग कोण कसा करेल.. त्याच्याच सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. या सगळ्या प्रकारामागे हे अनावधानाने आलेलं विधान नाही.' अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी कोश्यारींवर केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारीचं 'ते' वादग्रस्त विधान

मुंबईतील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारी असं म्हणाले की, ''कधी-कधी मी इथे मी लोकांना सांगतो की, महाराष्ट्रात (Maharashtra) विशेषत: मुंबई (Mumbai) आणि ठाणे (Thane) इथून गुजरातींना (Gujarati) काढून टाका आणि राजस्थानी लोकांना काढून टाका तर तुमच्याकडे काही पैसे उरणारच नाहीत. ही जी राजधानी आहे जी आर्थिक राजधानी (financial capital) म्हणून संबोधली जाते मग ती आर्थिक राजधानी राहणारच नाही.' असं वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांनी केलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी