Shinde Pawar Similarity : एकनाथ शिंदे हे नवे शरद पवार होत आहेत का?

मुंबई
अमोल जोशी
Updated Jul 14, 2022 | 15:22 IST

सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा बहुमान शरद पवारांना मिळाला होता तो 1978 साली त्यांनी स्थापन केलेल्या पुलोद सरकारमुळे. ते सरकार आणि आताचं सरकार याच्या निर्मितीत अनेक बाबतीत साम्य आहे.

Shinde Pawar Similarity
पुलोद सरकार आणि सध्याच्या सरकारमधील साम्य  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • पवारांनी 1978 सालीदेखील फोडले होते 40 आमदार
 • तेव्हाही उपमुख्यमंत्र्यांवरच फुटलं होतं खापर
 • दोन्ही सरकारांमध्ये अनेक साम्य

Shinde Pawar Similarity :महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवे शरद पवार होऊ पाहतायत का, हे आज आपण तपासून पाहणार आहोत. शरद पवारांनी १९७८ साली स्थापन केलेलं पुलोद सरकार आणि सध्या सत्तेवर आलेलं एकनाथ शिंदे सरकार यामध्ये 7 गोष्टी सारख्या आहेत. 

 1. पहिली गोष्ट म्हणजे १९७८ साली शरद पवारांनी काँग्रेस यु मधून ४० आमदार फोडले होेते आणि नवं सरकार स्थापन केलं होतं. यावेळीदेखील एकनाथ शिंदेंनी ४० आमदार फोडलेत आणि सरकार स्थापन केलंय. 
 2. त्यावेळी फुटलेल्या गटाचे नेते असणारे शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते.  आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष असणाऱ्या जनता पार्टीनं त्यांना पाठिंबा दिला होता. जनता पार्टीकडे तेव्हा ९९ आमदार होते. तर पवार असलेल्या काँग्रेस (यु) पक्षाचे ६९ आमदार होते. 
 3. एवढं मोठं बंड होईल आणि सरकार पडेल, अशी अपेक्षा त्यावेळी कुणीही केली नव्हती. शरद पवार त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना भेटायला गेले होते आणि दोघांनीही एकमेकांची विचारपूस केली. त्यानंतर पवार सरकारी गाडी सोडून टॅक्सीने परत आले आणि संध्याकाळी त्यांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी पवार असं काही करतील, याचा थोडाही अंदाज वसंतदादांना आला नव्हता. त्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. यावेळी पण असंच झालं. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शेवटच्या दिवसापर्यंत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र होते. आणि त्या रात्री काय घडलं हे आपल्याला माहित आहे. 
 4. त्यावेळी सरकार पडण्याचं खापर फोडण्यात आलं होतं उपमुख्यमंत्री असणाऱ्या नासिकराव तिरपुडे यांच्यावर. आणीबाणीनंतर काँग्रेसमध्ये त्यावेळी फूट पडली होती. काँग्रेस यु आणि काँग्रेस आय असे दोन गट पडले होते. काँग्रेस आय हा इंदिरा गांधी समर्थकांचा गट होता, तर काँग्रेस यु हा मूळ काँग्रेसला मानणारा गट होता. या दोन्ही गटांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या होत्या. या निवडणुकीत जनता पार्टीला सगळ्यात जास्त ९९ जागा मिळाल्या होत्या. यशवंतराव चव्हाण, वसंतदाद पाटील आणि शरद पवार यांच्या काँग्रेस यु पक्षाला ६९ जागा मिळाल्या होत्या, तर नासिकराव तिरपुडे नेतृत्व करत असलेल्या काँग्रेस आयला ६२ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे वसंतदादा मुख्यमंत्री होते आणि नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री होते. मात्र तिरपुडेंचा बोलघेवडेपणा आणि टीका  वाढत गेल्यामुळे आम्ही बाहेर पडत आहोत, असं पवारांनी म्हटलं होतं. यावेळी अशीच टीका ही अजित पवारांच्या कार्यपद्धतीबाबत करण्यात आली आणि शिवाय बोलघेवडेपणाचा ठपका हा संजय राऊतांवर ठेवण्यात आला. 
 5. सरकारमध्ये ज्या पक्षाचा उपमुख्यमंत्री होता, त्या पक्षाकडून आपल्याला संपवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका ज्या पक्षाचा मुख्यमंत्री होता, त्याने केली होती. त्यामुळे मूळ काँग्रेसला वाचवण्यासाठीच आपण बंड करत असल्याची भूमिका पवारांनी आणि त्यांच्या गटानं घेतली होती. आतादेखील तेच होतंय. 
 6. या घटनेनंतर पुढे आयुष्यभर वसंतदादांनी शरद पवारांना कधीच माफ केलं नाही. खंजीर हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचलित झाला, तो पुलोद सरकारच्या स्थापनेपासूनच. आणि तेव्हापासून सतत पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. विरोधकांपेक्षाही काँग्रेसमधील पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांनीच पवारांची ही प्रतिमा सतत जागती आणि जिवंत राहिल, यासाठी प्रयत्न केले. आता या घटनेला ४० वर्षं उलटून गेलीयत आणि पुन्हा एकदा ४० आमदार फोडून सरकार स्थापन झालं आहे. आणि पुन्हा एकदा खंजीर हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत येऊ लागला आहे. 
 7. पक्ष फोडल्यानंतर शरद पवारांच्या गटाला काँग्रेस हे नाव सोडायचं नव्हतं. त्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाला समाजवादी काँग्रेस असं नाव दिलं होतं. म्हणजे नावात काँग्रेस असावं हे तेव्हाही पवारांनी पाहिलं आणि राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हाही पाहिलं. एकनाथ शिंदे गटाकडूनदेखील शिवसेना या नावासाठी लढाई सुरू आहे. त्यांना शिवसेना हे नाव मिळेल की नाही, हा कायदेशीर लढाईचा प्रश्न आहे. मात्र ते नाही मिळालं तरी पक्षाच्या नावात सेना असेल, अशी चर्चा आहे. 

अधिक वाचा - बळीराजासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान

अर्थात, पुलोदचा प्रयोग आणि सध्याचं राजकारण यात काही मूलभूत फरकही आहेत. 

 1. पुलोदची घटना घडली तेव्हा आणीबाणी नुकतीच संपली होती. केंद्रातलं काँग्रेस सरकार पडलं होतं आणि प्रचंड अस्थिरता होती. सध्या मात्र केंद्रातलं सरकार हे स्थिर सरकार आहे.
 2. ज्या पक्षात फूट पडली तो एक राष्ट्रीय पक्ष होता. त्यामुळे एका राज्यातल्या ४० आमादारांचा बंड हा काही पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न नव्हता. सध्याची परिस्थिती मात्र थोडी वेगळी आहे. 
 3. १९७८ साली पुलोदचा प्रयोग झाला तेव्हा पक्षांतरबंदी कायदा अस्तित्वात नव्हता. तो तयार झाला १९८५ साली. त्यामुळे कुठल्याही कोर्टकचेऱ्यांचा प्रश्न नव्हता. 
 4. शरद पवारांच्या या बंडाला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि तेव्हाचे काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते यशवंतराव चव्हाण यांचा मूक पाठिंबा होता, अशी चर्चा होती. यावेळीसुद्धा सुरुवातीचे काही दिवस अशी चर्चा रंगली होती. मात्र आता मात्र तसं दिसत नाहीय. कारण या केसमध्ये यशवंतराव आणि  वसंतराव या दोन्ही भूमिकांमध्ये उद्धव ठाकरेच होते. 
 5. पुलोद सरकार पावणेदोन वर्षं टिकलं. हे सरकार किती टिकेल, कुणीच सांगू शकत नाही. 
 6. पुलोदच्या प्रयोगानंतर शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि 1999 पर्यंत त्यांनी पुन्हा काँग्रेसमधूनच आपलं राजकारण केलं. एकनाथ शिंदे आत्ता काय करणार, हा फार महत्त्वाचा प्रश्न नाहीय. तर या सरकारचा कालावधी संपल्यावर किंवा संपण्यापूर्वी जेव्हा कधी पुढच्या विधानसभा निवडणुका लागतील, त्यावेळी ते कुठल्या पक्षाचे प्रतिनिधी असणार, हा खरा प्रश्न आहे. 
 7. शरद पवारांनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यावर हमखास निवडून येणाऱ्या दिग्गज नेत्यांची मोळी बांधली आणि स्वतःचा पक्ष उभा केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते हे त्या त्या प्रांताचे एक प्रकारे अलिखित मनसबदार होते आणि कुठल्याही पक्षातून उभे राहिले, तरी हमखास निवडून येणार, या क्षमतेचे होते. एकनाथ शिंदेंसोबत आता ४० आमदार फुटले असले तरी अशा प्रकारचे हमखास निवडून येणारे नेते ते एकत्र करू शकतील का हा प्रश्न आहे.

अधिक वाचा - Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार होणार या तारखेला; किती आमदारांचा होणार शपथविधी?

अर्थात, शरद पवारांनी केलेलं बंड हे दिल्लीला दिलेलं आव्हान होतं. तर एकनाथ शिंदे यांचं बंड हे दिल्लीच्या मदतीनं झालं होतं. मात्र शरद पवार ज्या घटनेमुळे पहिल्यांदा देशभर चर्चेत आले ते कारण होतं पुलोद सरकार आणि एकनाथ शिंदे ज्या घटनेमुळे पहिल्यांदा देशभर चर्चेत आले ते कारण आहे सध्याचं शिंदे सरकार. या दोन्ही नेत्यांची सुरुवात कॉमन आहे, पण पुढचा प्रवास कॉमन असेल का? 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी