Kirit Somaiya :मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची फैरी झाडणारे भाजपा नेते (BJP leader) आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Former MP Kirit Somaiya) सध्या वादात अडकले आहेत. किरीट सोमय्यांचा एक फोटो या वादासाठी कारणीभूत ठरला आहे. सोमय्या यांनी मंत्रालयात नगरविकास खात्याच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स तपासल्याचा कथित फोटो सध्या व्हायरल झाला आहे. त्यावरून सत्ताधारी नेत्यांनी सोमय्यांवर कारवाईची मागणी केली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावरून सोमय्यांवर टीका केली आहे. तर किरीट सोमय्या यांनी मात्र त्यांच्या कृतीचं समर्थन केले आहे. माहिती अधिकार अंतर्गत आपण माहिती मागवली होती आणि त्यासाठी आपण तिथे गेलो होतो, असं सोमय्या यांनी म्हटले आहे.
काय आहे सचिन सावंत यांचा आक्षेप –
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यावरुन टीका केली असून म्हटले आहे की, “भाजपा नेत्यांची मानसिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. सत्ता गेल्यापासून त्यांचं वर्तन अत्यंत बेफाम झाले आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची त्यांची तयारी आहे”. “किरीट सोमय्या ज्या पद्धतीने नगरविकास खात्याच्या मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासत होते त्याची चौकशी करण्याची गरज आहे. जर त्यांनी आरटीआय अंतर्गत परवानगी घेतली नसेल तर हा गुन्हा आहे, म्हणूनच चौकशी व्हावी. जर गुन्हा घडल्याचं सिद्ध झाला तर गुन्हा दाखल झाला पाहिजे,” अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.
“नगरविकास खात्याने हे तपासून पहावं. फाईल त्या विभागाच्या ताब्यात असतात. जो या सरकारचा घटक किंवा संविधानिक पद नाही अशी कोणी व्यक्ती फाईल उघडून पाहू शकतं असं मला वाटत नाही,” असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. दरम्यान अधिकारी उभे होते यासंबंधी विचारण्यात आलं असता, एखादा माजी खासदार आलाच तर मराठी माणूस मोठ्या माणसासाठी खुर्ची रिकामी करतो, त्यात त्यांचा दोष नाही.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने काही दिवसांपूर्वीच आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील छाबय्या विहंग या इमारतीला ठोठावण्यात आलेला तब्बल ३ कोटींचा दंड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपच्या नेत्यांनी या निर्णयावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. राज्य सरकारने नियम डावलून प्रताप सरनाईक यांच्या इमारतीचा दंड माफ केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.