मुंबई : एकनाथ शिंदेंचा गट (Eknath Shinde Group) म्हणजेच शिवसेना (ShivSena) असा ठामपणे मुख्यमंत्री (Chief Minister) शिंदेकडून दाखवलं जात आहे. आजपसून फ्लोअर टेस्टसाठी मुख्यमंत्री शिंदेंनी सेनेच्या सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. यामुळे विधानसभा अध्यक्षपदावरून राजकीय हमरीतुमरीचा दुसरा अंक पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी रविवारपासून बोलावलेल्या विशेष अधिवेशनाची सुरुवातच अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेच्या वादानेच होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना आणि शिंदे गटात व्हिपवरुन वाद होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून शिंदेंसह सर्व आमदारांना व्हिप बजावण्यात आला आहे. तर शिवसेनेचा व्हीप लागू होत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी काल दिली आहे.
आजपर्यंतची बिनविरोध अध्यक्ष निवडीची परंपरा मोडीत काढून यंदा भाजप-शिंदे गटाकडून अॅड. राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीतर्फे राजन साळवी या रिंगणात आहेत. शिवसेनेने सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे तर शिंदे गटानेही सेनेच्या आदित्य ठाकरेंसह १६ जणांना व्हीप बजावला आहे. सकाळी ११ वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. काँग्रेसचे नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यापासून रिक्त अध्यक्षपदाच्या निवडीसाठी निवडणूक होत आहे. ही निवड कुणाच्या नेतृत्वाखाली होणार येथूनच याचे नाट्य सुरू झाले आहे. मंत्रिमंडळ बरखास्त झाले असले तरी सभागृह अस्तित्वात असल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखालीच ही निवड होईल, अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे, तर झिरवाळ यांच्यावर अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असल्याने राज्यपालांनी नेमलेल्या हंगामी अध्यक्षांच्या नेतृत्वात ही निवड व्हावी, अशी भाजपची भूमिका आहे.
शिवसेनेतर्फे राजन साळवी यांनी अर्ज भरला आहे. निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंहसह शिवसेनेच्या आमदारांना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप बजावला असून साळवी यांना मतदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोण आहेत अध्यक्षपदाचे उमेदवार
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपनं राहुल नार्वेकरांना संधी दिली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरलेला नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा अर्धा तास उरला असताना महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत अखेर राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.