जुळ्यांचे गुण जुळेच! दहावीच्या परीक्षेत साताऱ्यातील भाऊ, बदलापूरच्या बहिणींची जुळी कामगिरी

मुंबई
Updated Jun 12, 2019 | 14:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

साताऱ्यातील दुष्काळी भाग असलेल्या माण तालुक्यातील जुळ्या भावंडांना दहावीच्या परीक्षेत जुळे गुण मिळाले आहेत. तर बदलापूरच्या जुळ्या बहिंनीही जुळे मार्क मिळाल्यानं त्यांचं कौतुक केलं जातं आहे. जाणून घ्या बातमी...

students
(प्रातिनिधीक फोटो) जुळ्यांचे जुळे गुण  |  फोटो सौजन्य: Times of India

सातारा: तुम्ही अभिनेता सलमान खान आणि वरुण धवनचा जुडवा बघितलाच असेल. त्यात एकाला मारलं तर दुसऱ्याला लागत असतं. पण साताऱ्यातील दोन जुळ्या भावंडांनी दहावीत सेम टू सेम मार्क मिळवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलेला आहे आणि असंच काहीसं बदलापूरच्या जुळ्या बहिणींनी केलं आहे. साताऱ्यातील दुष्काळी भाग माण तालुक्यातील शैलेश काळेल आणि योगेश काळेल या जुळ्या भावंडांनी दहावीमध्ये ७७.४० टक्के गुण मिळवले आहेत. या जुळ्या भावंडांची जुळी कामगिरी बघून त्यांच्या नातेवाईक आणि गावकऱ्यांनाच फक्त आश्चर्याचा धक्का बसला असं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला अश्चर्याचा धक्का बसला आहे.

शैलेशला मराठीत 60, हिंदीत 85, इंग्रजीत 67, गणितात 83, विज्ञानात 59, आणि इतिहासात 89 गुण मिळाले आहेत. तर योगेशला मराठीत 70, हिंदीत 82, इंग्रजीत 61, गणितात 69, विज्ञानात 78 आणि इतिहासात 88 गुण मिळाले आहेत. विषयांचे गुण वेगवेगळे असले तरी यांचे एकूण मार्क्स ४४३ इतकेच आहेत.

शैलेश आणि योगेश लहानपणापासून अतिशय खोडकर आहेत. एकाने मस्ती करायची आणि दुसऱ्यानं मार खायचा. त्यांच्या खोड्या वाढल्यामुळे अखेर त्यांच्या पालकांनी त्यांना वेगवेगळ्या शाळेमध्ये घालून दोघांची फाटाफूट केली. पण दोघांनीही जुळे असल्याचे अशाप्रकारे प्रमाणच दिलं आहे. 

बदलापूरच्या जुळ्या बहिणींची चमकदार कामगिरी

शिक्षणामध्ये मुलींचं पारड नेहमीच जड असतं. मग या कामगिरीत तरी मुली मागे कशा राहतील. बदलापूरच्या रिद्धी आणि सिद्धीनं सुद्धा अशाचप्रकारे कामगिरी केलीय आणि त्या सगळीकडे चर्चेचा विषय बनल्या आहेत. दोघीही बदलापूर जवळच्या अंबेशिव गावात राहतात. त्यांचं नाव रिद्धी व्यापारी आणि सिद्धी व्यापारी आहे. दोघी सानेगुरूजी विद्यालयात शिकतात. दोघींनाही 600 पैकी 420 इतके मार्क्स मिळाले आहेत. त्यांच्या या कामगिरीनं कुटुंबियचं नव्हे तर संपूर्ण गावानं आनंद व्यक्त केला आहे.

या गुणी मुलींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 84 टक्के इतके मार्क्स मिळवले आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. एकाच पुस्तकावर या दोघींनी अभ्यास केला. एका ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी आपलं दहावीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यामुळं त्यांच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांना आपलं पुढील शिक्षण कॉमर्समधून पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर त्यांचं बँकेत अधिकारी बनण्याचं स्वप्न आहे.

मुंबईतील १२वीच्या जुळ्या भावांनाही मिळाले जुळे गुण

मुंबईत राहणाऱ्या रोहन आणि राहुल चेम्बाकसेरिल या जुळ्या भावंडांनी आयसीएसई बोर्डाची इयत्ता 12वीची परीक्षा दिली. विशेष असे की, या भावंडांना परिक्षेत मिळालेले मार्क्सही जुळे आहेत. म्हणजे दोघांना ही बरोबर 96.05 टक्केच मार्क्स मिळाले आहेत. हा योगायोग असला तरी, या प्रकाराची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी