SSC, HSC exam guidelines: दहावी आणि बारावी परीक्षा ऑफलाईनच होणार, लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटांचा वाढीव वेळ

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 20, 2021 | 15:07 IST

SSC HSC exams updates: दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत. तर यंदाच्यावर्षी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली

Exams
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार - शिक्षणमंत्री 
 • यंदाच्या वर्षी लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३० मिनिटांचा वाढीव वेळ
 • दहावी-बारावीचे प्रॅक्टीकल्स लेखी परीक्षेनंतर होणार 

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांच्या संदर्भात आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळेत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहेत. यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटांचा वाढीव वेळ देण्यात येणार असून परीक्षा सकाळी ११ ऐवजी १०.३० वाजता सुरू होईल. (SSC class 10 HSC class 12 examination will be held offline mode with extra time in Maharashtra said Varsha Gaikwad)

परीक्षेसाठी यंदा वाढीव वेळ

दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी तास वेळ दिला जात असे. परंतु यावर्षी विद्यार्थ्यांचा लेखनाचा  सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ४० आणि ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी २० मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल.

शाळेतच परीक्षा केंद्र

कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येतील. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल.

...तर विशेष परीक्षेचे आयोजन

एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेन्मेंट झोन, संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन जून महिन्यात करण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी आणि ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.

पुरवणी परीक्षा

परीक्षा मंडळामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.

सुरक्षात्मक उपाययोजना

 1. परीक्षेच्या संदर्भात शाळा / कनिष्ठ महाविद्यालय, केंद्र प्रमुख पर्यवेक्षक व अन्य बाबींसाठी स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात येतील. 
 2. कोविड १९ बाबत केंद्रशासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना स्वतंत्र निर्गमित करण्यात येतील. 
 3. सर्व विद्यार्थ्यांना / पालकांना आवाहन करण्यात येते की राज्यमंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरीलच माहिती अधिकृत समजण्यात यावी.

प्रात्यक्षिक परीक्षा

 1. इयत्ता १०वीच्या दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जात असत परंतु यावर्षी कोविड १९ परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य (Assignment) गृहपाठ पद्धतीने घेण्यात येतील. 
 2. प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी विशिष्ट लेखनकार्य, गृहपाठ पद्धतीने २१ मे २०२१ ते १० जून २०२१ या कालावधीत सादर करण्यात यावेत.
 3. इयत्ता १२वीच्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा २२ मे २०२१ ते १० जून २०२१ या कालावधीत होतील. 
 4. कोविड १९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे १२वीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून ५ ते ६ प्रात्यक्षिकांवरच परीक्षा घेण्यात येईल. व त्या संदर्भात माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल.
 5. कला / वाणिज्य / व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेनंतर १५ दिवसांत असाईन्मेंट सादर करावेत.
 6. इयत्ता १०वी आणि १२वी मधील विद्यार्थ्यांस अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधीत कोरोनाचा संसर्ग झाल्यास किंवा लॉक़डाऊन, कन्टेन्मेंट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषयक परिस्थितीमुळे, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा असाईन्मेंट सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल.

१०वी आणि १२वीच्या लेखी परीक्षा

इयत्ता १०वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. 
इयत्ता १२वीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने लेखी परीक्षा होईल.

वर्षा गायकवाड यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

 1. विद्यार्थी असलेल्या शाळेतच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. जर विद्यार्थ्यांना परीक्षा  वर्ग खोली कमी पडत असल्यास नजीकच्या शाळेत परीक्षेची व्यवस्था केली जाईल. 
 2. यंदाच्या वर्षी लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळ
 3. लेखी परीक्षेसाठी अतिरिक्त ३० मिनिटांचा वेळ
 4. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक तासाचा अतिरिक्त वेळ
 5. ४० ते ५० मार्क्सच्या पेपरसाठी १५ मिनिटांचा वाढीव वेळ 
 6. यावर्षी अर्धातास आधी परीक्षा सुरू होणार, ११ ऐवजी १०.३० वाजता परीक्षा सुरू होणार 
 7. विद्यार्थ्यांना कोविड झाल्यास विशेष परीक्षा जून महिन्यात घेतली जाईल 
 8. दहावी-बारावीचे प्रॅक्टीकल्स लेखी परीक्षेनंतर होणार 
 9. लेखी परीक्षेनंतर १५ दिवसांत प्रॅक्टिकल परीक्षा 
 10. २२ ते १० जून दरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा होणार 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी