Maharashtra School Start : मुंबई : कोरोना (Corona) आणि त्यानंतर लॉकडाऊन (Corona Lockdown) यांचा राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाला होता. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग (Online School) भरवण्यात आले. पण दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र सोयी-सुविधांच्या अभावामुळे शाळेपासून दूर राह लागले होते. सध्या राज्यातील कोरोना स्थिती साधरण असल्यानं सर्व निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. यामुळे राज्यभरात आजपासून म्हणजेच, 13 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने यासंदर्भात माहिती देत शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर केली. शिक्षण आयुक्तांनी पत्रक काढत विदर्भ वगळता राज्यातील शाळा 13 जूनपासून सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे. विदर्भात मात्र शाळा 27 जूनपासून सुरू होणार आहेत.
काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती दिली होती. पुढे बोलताना गायकवाड यांनी म्हटलं होतं की, राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळांसंदर्भात निर्णय घेतला जाईल. शाळा सुरू करण्यापूर्वी चाइल्ड टास्क फोर्स असेल किंवा आरोग्य विभाग त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असंही त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान शाळा जरी 13 जून रोजी सुरु होत असल्या तरी विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं आदेशात म्हटलं होतं. 13 आणि 14 जून रोजी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहात शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण तसेच कोरोना संदर्भात उद्बोधन करायचं आहे, असं आदेशात म्हटले आहे. शाळेत येणारे विद्यार्थी तसेच पालकांचं कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रबोधन करावं असे देखील आदेशात म्हटले आहे. राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी एकवाक्यता आणि सुसंगती येण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडून निर्देश जारी करण्यात आले. आदेशात शैक्षणिक सत्र 2022 - 23 सुरू करण्यासाठी निर्देश देण्यात आले. शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार, राज्यातील शाळा आणि शैक्षणिक सत्र 13 जूनपासून सुरू होणार आहे. तर विदर्भातील तापमानाचा आढावा घेऊन विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरू होणार असल्याचं या निर्देशात म्हटलं आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी 15 जूनपासून तर विदर्भातील विद्यार्थ्यांनी 27 जूनपासून प्रत्यक्षात शाळेत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.