राज्याचे मंत्री राम शिंदेंवर अतिक्रमण केल्याचा आरोप, पंतप्रधान मोदींकडे थेट तक्रार

मुंबई
Updated May 30, 2019 | 15:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आतापर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यातच आता आणखी एका नावाची भर पडली आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे.

Ram Shinde
प्रा. राम शिंदेंवर भ्रष्टाचाराचा आरोप 

कर्जत : राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी कर्जत येथील वकील कैलास शेवाळे हे हायकोर्टात जाणार असल्याचं म्हटलं आहे. त्यासंबंधी पत्रकार परिषद घेत शेवाळे यांनी माहिती दिली आहे. तसंच राम शिंदे यांच्या गैरव्यवहाराबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं असून, त्यांनी कारवाई न केल्यास कोर्टात जाऊ, असंही ते म्हणाले. कर्जत-जामखेडचे पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर शेवाळे यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं आहे.

काय आहे हे प्रकरण

राम शिंदे यांनी त्यांचे वडील शंकर शिंदे यांच्या नावावर चौंडी इथं एक बंगला बांधला आहे. या बंगल्यात स्वत: राम शिंदे राहतात. मात्र हा बंगला बांधत असताना त्यांनी चौंडी ते अरणगाव रस्ता आणि चौंडी ते देवकरवस्ती रस्त्यांवरची १५ आणि १२ मीटर इतक्या सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप वकील कैलास शेवाळे यांनी केला आहे.

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी ३ ऑगस्ट २०१५ रोजी मौजे चौंडी, ता. जामेखड इथं अविनाश शिंदे यांच्याकडून जमीन खरेदी केली. या जागेचं क्षेत्रफळ २५२८ स्क्वेअर फूट आहे आणि ती जमीन राम शिंदे यांचे वडील शंकर शिंदे यांच्या नावावर आहे. मात्र जमिनीच्या सातबारावर त्या जागेचं क्षेत्रफळ ३२०० स्क्वेअर फूट दाखवलंय.

त्यानंतर राम शिंदे यांच्या वडिलांनी ही ३२०० स्क्वेअर फूट जमीन बिगरशेती जमीन करवून घेतली. त्यासाठी त्यांनी जामखेड तहसीलदार यांच्याकडे लेखी अर्ज केला होता. तहसिलदारांनी ही परवानगी मान्य केली आणि काही अटींनुसार त्या जमिनीला बिगर शेती म्हणून परवानगी दिली.

मात्र कुठल्याही नियमाप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ठराविक जागा सोडावी लागते. पण राम शिंदे यांनी त्याजागेवर बंगला बांधताना चौंडी ते अरणगाव रस्त्याला केवळ ५ मीटर जागा सोडून बंगला बांधला. जेव्हा की कायद्यानुसार त्यांनी १५ आणि १२ मीटर जागा दोन्ही बाजूंनी सोडायला हवी होती. तसंच बंगल्याचं मुख्य प्रवेशद्वार हे रस्त्याच्या १५ मीटरच्या आतच आहे आणि त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्रास होतो. अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावरून जाता येत नाही, असा आरोप शेवाळे यांनी केला आहे.

दोन्ही रस्त्यांवरून हे अतिक्रमण हटवावं आणि याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी शेवाळे यांनी केलीय. तसं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवलं.

राम शिंदे हे कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. प्रा. राम शिंदे यांचं रेकॉर्डवरील खरं नाव रामदास शंकर शिंदे आहे. ते विधानसभा निवडणुकीमध्ये दुसर्‍यांदा निवडून आले आहेत. मागील तीन ते साडेतीन वर्षांपासून ते राज्याचे जलसंधारण मंत्री आहेत. तसंच जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
राज्याचे मंत्री राम शिंदेंवर अतिक्रमण केल्याचा आरोप, पंतप्रधान मोदींकडे थेट तक्रार Description: राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आतापर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यातच आता आणखी एका नावाची भर पडली आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे.
Loading...
Loading...
Loading...