अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात जोरदार खडाजंगी?, बैठकीत असं काय घडलं?

मुंबई
रोहित गोळे
Updated Jan 03, 2020 | 09:01 IST

खातेवाटपासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात जोरदार खडाजंगी झाली असल्याचं समजतं आहे. 

strong clash between ajit pawar and ashok chavan
अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात जोरदार खडाजंगी?, बैठकीत असं काय घडलं?  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: राज्यातील नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन ३ दिवस उलटले आहेत. मात्र, तरीही नव्या मंत्र्यांना खातेवाटप झालेलं नाही. यासाठी गेले दोन दिवस सलग मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. यापैकी बुधवारी झालेल्या एका बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यात जोरदार खडाजंगी झाली असल्याचं वृत्त नुकतंच समोर येत आहे. हे वृत्त काही वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्र्यांचा शपथविधी पार पडला असला तरीही कुणाला कोणती खाती मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे गेले दोन दिवस यासाठी तीनही पक्षांची सलग चर्चाही सुरु आहे. पण अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळेच खातेवाटप जाहीर करण्यात आलेलं नाही. काँग्रेस काही महत्त्वाच्या खात्यांची मागणी करत असल्याने खाते वाटपाचं घोडं अडलं असल्याचं समजतं आहे. 

काँग्रेसला ग्रामीण भागाशी संबंधित महत्त्वाची अशी कृषी आणि ग्रामविकास खाती हवी असल्याने त्यांनी आपली मागणी सतत लावून धरली आहे. पण याचमुळे बैठकीत अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात वाद झाला असल्याचे समजते आहे. अशोक चव्हाण यांनी महत्त्वाच्या खात्यांचा आग्रह धरला त्यावेळी अजित पवार यांनी आधी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा झाली असल्याचं सांगितलं. त्यामुळे अशोक चव्हाण हे बैठकीतच संतप्त झाले. यावेळी अशोक चव्हाण असे म्हणाले की, 'ते आता मंत्रिमंडळात नाही, त्यांचा इथे काहीही संबंध नाही.' त्यावर अजित पवारांनी पुन्हा एकदा असं म्हटलं की, 'पृथ्वीराज चव्हाण हे चर्चेत होते. ते संयमी नेते आहेत. त्यामुळे तुमच्यात नेमका नेता कोण हे आधी ठरवा.' असं म्हणत अजित पवार यांनी अशोक चव्हाण यांना अधिक डिवचण्याचा प्रयत्न केला. 

दुसरीकडे, अजित पवारांच्या याच वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या अशोक चव्हाण यांनी तात्काळ बैठकीतून बाहेर पडत आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे काल देखील खातेवाटप जाहीर होऊ शकलं नाही. 

दरम्यान, काल दिवसभर अशी चर्चा होती की, संध्याकाळपर्यंत खातेवाटप केलं जाईल. मात्र, अद्यापही खातेवाटप होऊ शकलेलं नाही. पण यामुळे आता सरकारवर टीका देखील होऊ लागली आहे. त्यामुळे लवकरात लवकर खातेवाटप व्हावं यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आग्रही असल्याचं समजतं आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी