मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary Education) घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा (Twelfth exam) निकाल (Result) या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल 8 ते 9 जून रोजी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे राज्य मंडळातील सूत्रांनी सांगितले आहे. दहावीच्या परीक्षेला राज्यभरातून तब्बल 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी बसले होते. तर बारावीच्या परीक्षेला 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी बसले होते.
दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्याचं ठरवत राज्य मंडळाने यंदा परीक्षा ऑनलाईन न घेता ऑफलाईन घेतल्या. दरम्यान काही तांत्रिक अडचणींमुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदलदेखील करावे लागले, त्यामुळे दहावीच्या परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान पार पडली.
बारावीचा निकाल 10 जूनला जाहीर करण्यात येईल, असे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले होते. परंतु राजकीय दबावापोटी त्या तारखेला निकाल जाहीर करणे शक्य होणार नाही. यामुळे हा निकाल एक किंवा दोन दिवस आधीच जाहीर केला जाणार आहे.
निकाल जाहीर करण्याचे श्रेय घेण्यासाठी तारखेत बदल करण्यात येणार असून तारीख शालेय शिक्षणमंत्र्यांकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आणि राजकीय श्रेयवादाची लढाई रंगणार असली, तरी निकाल मात्र याच आठवड्यात जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.