Supreme Court quashes MVA government's decision violating constitution : मुंबई : महाराष्ट्राच्या विधीमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या बारा आमदारांचे निलंबन रद्द ठरविणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा लोकशाही वाचविणारा ऐतिहासिक निर्णय असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. संविधानाची पायमल्ली करत हुकुमशाही पद्धतीने सरकार चालविण्याचा मविआचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडला. मविआ सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ही जोरदार चपराक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
वाचा : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची मूळ प्रत (PDF File)
लोकशाहीविरोधी, बेकायदा, अवैध, असमर्थनीय प्रकार लोकशाहीत कधीच खपवून घेतले जात नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या आमदारांविषयीच्या निर्णयाने यावर शिक्कामोर्तब झाले; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी निलंबन रद्द झाल्याबद्दल बारा आमदारांचे अभिनंदन केले.
कुठलेही कारण नसताना प्रदीर्घ काळासाठी आमदारांचे निलंबन हे असंविधानिक आहे. मविआ सरकारने सभागृहातील कृत्रिम बहुमत सुरक्षित राखण्यासाठी ही कृती केल्याचे भाजप आधीपासून सांगत होते. आता सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या चौकटीत कायद्यांचे संदर्भ देत हेच मुद्दे सांगितले; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
प्रश्न फक्त बारा आमदारांच्या निलंबनापुरता मर्यादीत नव्हता तर त्या मतदारसंघांतील ५० लाखांपेक्षा जास्त मतदारांचा होता. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लोकशाहीचे रक्षण झाले; असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आमदारांविषयीच्या निर्णयाचे स्वागत केले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.