शिवसेना कामगार नेते सूर्यकांत महाडिक यांचे निधन

शिवसेनेचा झुंजार कामगार नेता अशी ओळख असलेले सूर्यकांत महाडिक यांचे अल्पशा आजाराने चेंबूरच्या झेन हॉस्पिटलमध्ये सोमवारी ११ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता निधन झाले.

Suryakant Mahadik Passes Away
शिवसेना कामगार नेते सूर्यकांत महाडिक यांचे निधन 

थोडं पण कामाचं

  • शिवसेना कामगार नेते सूर्यकांत महाडिक यांचे निधन
  • सूर्यकांत महाडिक कामगार क्षेत्रातील एक जाणते नेतृत्व
  • सलग वीस वर्षे भारतीय कामगार सेनेचे नेते

मुंबईः शिवसेनेचा झुंजार कामगार नेता अशी ओळख असलेले सूर्यकांत महाडिक यांचे अल्पशा आजाराने चेंबूरच्या झेन हॉस्पिटलमध्ये सोमवारी ११ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता निधन झाले. अंत्यदर्शन उद्या (मंगळवारी) चेंबूरच्या निवासस्थानी (अमर निवास, महादेव पाटील वाडी, बोर्ला-घाटलागांव, चेंबूर) सकाळी ७ ते १० या वेळेत आहे. अंत्यसंस्कारासाठी पार्थिव रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या काडवली (पाचघर वाडी) येथे नेले जाईल. (Suryakant Mahadik Passes Away)

सूर्यकांत महाडिक कामगार क्षेत्रातील एक जाणते नेतृत्व

सूर्यकांत महाडिक शिवसेनेच्या (ShivSena) भारतीय कामगार सेना (Bhartiya Kamgar Sena - BKS) या संघटनेचे अनेक वर्ष समर्थपणे नेतृत्व करत होते. त्यांच्या निधनामुळे कामगार क्षेत्रातील एक जाणते नेतृत्व गमावल्याची भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली.

शिवसेनाप्रमुखांनी सूर्यकांत महाडिकांकडे सोपवली कामगार सेनेची जबाबदारी 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी कामगारांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सूर्यकांत महाडिक यांच्याकडे मोठ्या विश्वासाने सोपवली. महाडिक यांनी हा विश्वास अखेरपर्यंत जपला. सूर्यकांत महाडिक यांच्या नेतृत्वात भारतीय कामगार सेना (भाकासे) कायम कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढत आली. 

सूर्यकांत महाडिक सलग वीस वर्षे भारतीय कामगार सेनेचे नेते

शिवसेनेचे झुंजार नेते कमांडर दत्ताजी साळवी भारतीय कामगार सेना (भाकासे) या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. दत्ताजी साळवी यांच्या पश्चात काही काळ रमाकांत मोरे यांनी भारतीय कामगार सेना (भाकासे) या संघटनेचे नेतृत्व केले. यानंतर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी कामगारांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सूर्यकांत महाडिक यांच्याकडे सोपवली. सूर्यकांत महाडिक सलग वीस वर्षे समर्थपणे भारतीय कामगार सेना (भाकासे) या संघटनेचे नेतृत्व करत होते. त्यांच्या कार्यकाळात संघटना मोठी आणि सामर्थ्यशाली झाली.

शिवसेना उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे नेते सूर्यकांत महाडिक

कामगारांच्या हक्कांसाठी सूर्यकांत महाडिक यांनी केलेल्या संघर्षाची दखल घेण्यात आली. सूर्यकांत महाडिक यांना शिवसेना या राजकीय पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्त करण्यात आले. एकाचवेळी शिवसेना उपनेते आणि भारतीय कामगार सेना (भाकासे) या संघटनेचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सूर्यकांत महाडिक अतिशय समर्थपणे सांभाळत होते. सूर्यकांत महाडिक यांच्या नेतृत्वात कामगारांनी अनेक यशस्वी लढे दिले. 

भारतीय कामगार सेना (भाकासे) या संघटनेचे जाळे पसरवण्यात सूर्यकांत महाडिकांचे मोठे योगदान

अनेक कंपन्यांमध्ये मतभेद दूर करुन वेतन करार घडवून आणले गेले. कामगारांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी सूर्यकांत महाडिक यांच्या नेतृत्वात भारतीय कामगार सेना (भाकासे) या संघटनेने काम केले. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही भारतीय कामगार सेना (भाकासे) या संघटनेचे जाळे पसरवण्यात सूर्यकांत महाडिक यांचे लक्षणीय योगदान आहे. याच कारणामुळे सूर्यकांत महाडिक यांच्या निधनाने शिवसेनेने कामगार क्षेत्रातला आपला खंदा नेता गमावल्याची भावना अनेक कामगारांनी आणि शिवसैनिकांनी बोलून दाखवली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी