सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास CBIकडे देण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री म्हणाले...

मुंबई
सुनिल देसले
Updated Aug 01, 2020 | 13:16 IST

Uddhav Thackeray on Sushan Singh death case: सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी होत असताना आता यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • मुख्यमंत्री म्हणाले या प्रकरणाचं कुणीही राजकारण करु नये 
  • महाराष्ट्र पोलीस तपास करण्यास सक्षम आहेत 

मुंबई: सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा (Sushant Singh Rajput Sucide case) तपास मुंबई पोलीस (Mumbai Police) करत आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत अनेकांचे जबाबही नोंदवले आहेत. मात्र, असे असताना अनेकजण या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करत आहेत. इतकच नाही तर भारतीय जनता पक्षाकडूनही या प्रकरणाची सीबीआय चौकशी (CBI Inquiry) करण्याची मागणी होत आहे. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सीबीआय चौकशीची मागणी फेटाळत विरोधकांना सुनावले आहे.

मुंबई पोलीस सक्षम आहेत

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दिवसरात्र मेहनत करत आहेत. कोरोनायोद्धा म्हणून काम करत आहेत. मुंबई पोलिसांवर आरोप करणाऱ्यांची मी निंदा करतो. ज्यांच्याकडे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत कुठलीही माहिती असेल किंवा ठोस पुरावे असतील तर ते द्या. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. पण केवळ आणि केवळ राजकारणासाठी आरोप करणार असाल तर ते चुकीचं आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत.

आरोपांमुळे पोलिसांचं खच्चीकरण होतं. तुम्ही पाच वर्षे सत्ता भोगली काय केलं पोलिसांसाठी? किती सक्षम केलं पोलीस दल? घरं दिली का त्यांना? कोणत्या तोंडाने तुम्ही त्यांच्यावर आरोप करत आहात. आम्ही पोलिसांसाठी घरे देण्याची योजना जाहीर केली आहे पोलीस दल सक्षम करण्याचे काम आम्ही हातात घेतले आहे असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले आहे. 

सुशांतच्या चाहत्यांना आवाहन 

मी सुशांतच्या चाहत्यांना सागतो की, तुम्ही विश्वास ठेवा. ज्या कुणाकडे काही माहिती किंवा पुरावे आहेत त्यांनी द्या आणि त्यानंतर सरकारने काम नाही केलं तर तुम्ही आमच्यावर आरोप करु शकता. राजकारणाला बळी पडू नका आणि राजकारणामागे फरफटत जावू नका असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यावर भाष्य केलं होतं. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी नागरिकांची भावना आहे. पण राज्य सरकारची इच्छा दिसत नाही. पण आर्थिक गैरव्यवहार पाहता ईडी गुन्हा दाखल करु शकते.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण तपासात राज्यातील एका मंत्र्याचा दबाव: भाजप

भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटलं, "अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात राज्यातील एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत. CBI ने तात्काळ हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे".

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी