'अंबानींच्या घराबाहेरील जिलेटिनने भरलेली गाडी आणि घटनाक्रम संशय निर्माण करणारा'

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली गाडी आढळून आल्याच्या प्रकरणावरुन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले आहेत.

Devendra Fadanvis
देवेंद्र फडणवीस (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळलेली जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली गाडी आणि घटनाक्रम संशयास्पद
  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी एनआयएने करावी असी केली मागणी

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर गुरुवारी (२५ फेब्रुवारी २०२१) एक संशयास्पद स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या. तसेच या गाडीत एक धमकीचं पत्र सुद्धा मिळाल्याची माहिती समोर आली. या संपूर्ण घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मात्र, आता या प्रकरणावरुन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

घटनाक्रम संशय निर्माण करणारा

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्दयावर भाष्य करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलं, "मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्व प्रमुख व्यवसायिक मुंबईत राहतात. मुंबईची सुरक्षितता आणि मुंबईत उपलब्ध असलेल्या संधी यामुळे मुंबई हे अनेकांचं माहेरघर झालं आहे. रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनने भरलेली गाडी, एक धमकीचं पत्र सापडलं. या संपूर्ण घटनाक्रम प्रचंड संशय निर्माण करणारा आहे."

ही गाडी आली कुठून, तर गाडी मालक हा ठाण्याचा आहे. या गाडी मालकाने सांगितले की, 'मी माझी स्कॉर्पिओ घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना गाडीचे स्टेअरिंग जाम झाले आणि म्हणून मी माझी गाडी तेथेच पार्क केली आणि ओला कारने मुंबईत पोहोचलो. दुसऱ्या दिवशी मेकॅनिक घेऊन घटनास्थळी गेलो असता तेथे गाडी नहव्ती.' हीच स्कॉर्पिओ अंबानींच्या घराजवळ आढळली. त्यात जिलेटिनच्या कांड्या, धमकीचं पत्र होतं.

क्रिप्टो करंसी अकाऊंट फेक

यानंतर एका टेलिग्राम चॅनलवर एक पत्र आलं, 'जैश उल हिंद' नावाने. त्यात पैसे ट्रान्सफर करण्याचं म्हटलं आणि एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिले होते. पण नंतर लक्षात आलं की, हे क्रिप्टो करंसी अकाऊंट फेक असल्याचं समोर आलं. पोलिसांनी हे पत्र आल्याचं जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जैश उल हिंदने एक पत्र जाहीर करत म्हटलं आमचा आणि या घटनेचा काहीही संबंध नाही. ते टेलिग्राम अकाऊंट आमचं नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "त्या ठिकाणी एक नाही तर दोन गाड्या आढळल्या. रात्री एक वाजता एक गाडी पार्क झाली आणि रात्री तीनच्या सुमारास चालक तेथून निघून गेला. दुसरी गाडी पांढऱ्या रंगाची इनोव्हा होती. या दोन्ही गाड्या एकाच ठिकाणाहून आल्या आणि ते म्हणजे ठाण्यातून आल्या. गाडी आढळल्यानंतर सर्वप्रथम घटनास्थळी मुंबई पोलिसांचे सचिन वाझे तेथे पोहोचले आणि त्यानंतर इतर पोलीस अधिकारी दाखल झाले. मग सचिन वाझे यांना तपास अधिकारी म्हणून घोषित केलं. तीन दिवसांपूर्वी सचिन वाझे यांना तपासावरुन काढले."

अनेक योगायोग आहेत 

एक म्हणजे स्कॉर्पिओ गाडी मालक आणि सचिन वाझे हे दोघेही ठाण्यातील आहेत. दुसरं म्हणजे दोघांचाही आधीपासून संवाद होता. स्कॉर्पिओ मालक क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेला आणि त्या ठिकाणी एका व्यक्तीला भेटला. तो व्यक्ती कोण? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. त्यामुळे या घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्यात यावा अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी