Sanjay Raut Criticized on Kangana : कंगनाला दिलेले सर्व पुरस्कार परत घ्या; लाज लज्जा असेल तर तिने देशाची माफी मागावी- संजय राऊत

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 12, 2021 | 12:15 IST

Sanjay Raut Criticized on Kangana : संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. ”भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रनौतने उधळली.

Take back all the awards given to Kangana -Sanjay Raut
कंगनाला दिलेले सर्व पुरस्कार परत घ्या-संजय राऊत   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कंगनाच्या विधानावर पंतप्रधान मोदींनी आपली भूमिका स्पष्ट करावी.
  • सलमान खुर्शीद हे पुरुषाचे कंगना रनौत - संजय राऊत
  • ताम्रपट भिकाऱ्यांना दिली का? संजय राऊतांचा प्रश्न

Sanjay Raut Criticized on Kangana : मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. ”भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रनौतने टाइम्स नाउच्या कार्यक्रमात उधळली. या वक्तव्यावरुन कंगना वाद सापडली असून तिच्यावर टीका केली जात आहे. 
आता या वादात संजय राऊत यांनी देखील उडी घेतली असून, कंगनाच्या वक्तव्यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिला असे वक्तव्य करायची सवयच आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने देशाची माफी मागावी. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत. तसंच भाजपाध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर मत मांडले पाहिजे असेही म्हटले आहे.

गेल्या ७५ वर्षात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी स्वातंत्र्यसैनिकांना भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तोच सन्मान कंगनाना देण्यात आला हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे,” अशा शब्दांत संजय राऊतांनी नाराजी जाहीर केली आहे. ते मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. पुढे ते म्हणाले की, “अनेक स्वातंत्र्यसैनिकांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याबद्दल ताम्रपट देण्यात आले आहे. मग काय ही ताम्रपट भिकाऱ्यांना दिली? भाजपला यावर भूमिका स्पष्ट करावी लागेल. कंगनाला जे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत ते सगळे परत घेतले पाहिजेत. अन्यथा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचा हक्क आता भाजपला राहिलेला नाही”.

सलमान खुर्शीद यांच्यावरही टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात, सद्य:स्थितीतील हिंदुत्वाची तुलना ‘आयसिस’ व ‘बोको हराम’ या दहशवादी संघटनांच्या जिहादी विचारांशी केल्यामुळे राजकीय रणकंदन सुरू झाले आहे. संजय राऊत यांनी त्यांच्यावरही टीका केली असून तेदेखील कंगना आहेत, असा टोला लगावला. “त्या पुरुष वेषातील कंगना आहेत. अशा प्रकारची वक्तव्ये करुन काँग्रेस पक्षातील काही जुने जाणते म्हणवणारे काँग्रेस आणि राहुल गांधींना सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. ते विद्वान आहेत, पुस्तकं लिहितात, एखादी ओळ हिंदुत्वावर टाकतात आणि वाद निर्माण करुन आपल्या पोळ्या भाजतात. हिंदू धर्माला आयसिस’ व ‘बोको हराम’ उपमा देणं हेसुद्धा कंगनाने केलेल्या देशाच्या अपमानासारखाच आहे”.

“हिंदुत्वानं काय केलं आहे? काही लोक चुकीचे वागले असतील. जसं इस्लाम आणि इतर धर्मात आहे….म्हणून त्याचं खापर संपूर्ण हिंदुत्वावर फोडणं ही मुर्खांची लक्षणं आहेत. आम्ही याचा निषेध आणि धिक्कार करतो. काँग्रेसदेखील यावर भूमिका स्पष्ट करेल याची खात्री आहे. हे व्यक्तिगत मत असलं तरी ते काँग्रेसचे नेते आहेत. पक्ष अडचणीत यावा यासाठी अशी विधानं केली जात आहेत का हे पहावं लागेल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी