'राणेंना भाजपमध्ये घेणं दुधात मिठाचा खडा टाकण्यासारखं', शिवसेना नेत्याची राणेंवर थेट टीका

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 28, 2019 | 00:16 IST

Shivsena Criticized to Narayan Rane: नारायण राणेंना भाजपमध्ये घेणं म्हणजे दुधात मिठाचा खडा टाकण्यासारखं आहे. अशा शब्दात शिवसेनेच्या दीपक केसरकरांनी राणेंवर टीका केली आहे.

 narayan Rane_twitter
'राणेंना भाजपमध्ये घेणं दुधात मिठाचा खडा टाकण्यासारखं', शिवसेना नेत्याची राणेंवर थेट टीका  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • नारायण राणेंच्या भाजपप्रवेशाच्या चर्चेवर शिवसेनेला काय वाटतंय?
  • नारायण राणे यांच्यावर दीपक केसरकर यांची बोचरी टीका 
  • भाजप राणेंना पक्षात प्रवेश देणार का?

मुंबई: स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असे संकेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. दुसरीकडे राणे देखील भाजपमध्ये जाण्यासाठी उत्सुक असल्याचं समजतं आहे. पण आता याबाबत शिवसेनेकडून पहिल्यांदाच टीका करण्यात आली आहे. 'नारायण राणेंना भाजपमध्ये घेणं म्हणजे युतीत मिठाचा खडा टाकण्यासारखं आहे.' अशी थेट टीका शिवसेना नेते आणि गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. यामुळे आता नारायण राणेंना आत्तापासूनच शिवसेनेने विरोध करणं सुरु केलं आहे. यामुळे आता भाजप शिवसेनेचं ऐकणार की विरोध झुगारुन राणेंना भाजपमध्ये प्रवेश देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. 

नारायण राणे यांनी जेव्हा काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा देखील अशीच चर्चा होती की, राणे भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यावेळी त्यांनी दोनदा अमित शाहा यांची भेटही घेतली होती. पण तेव्हा राणेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी तेव्हा आपला स्वतंत्र पक्ष काढला होता. पण आता पुन्हा एकदा राणे भाजपमध्ये जाणार असून आपला पक्ष विलीन करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यावरुनच केसरकर यांनी टीका केली आहे. 

दीपक केसरकरांनी नेमकी काय टीका केली? 

'नारायण राणेंना भाजपमध्ये घेणं म्हणजे दुधामध्ये खडा टाकण्यासारखंच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात किती चांगलं नातं आहे. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे पुढे देखील ते असेच निर्णय घेत राहतील. ते अशा लोकांना पक्षात घेणार नाही. तसंही राणेंचा भाजपला नेमका उपयोग तरी काय आहे? कारण आता राणेंकडे फक्त एकच आमदार आहे. तो देखील काँग्रेसमधला. याशिवाय ते नेतृत्वाचा सन्मान देखील करत नाही.' अशा शब्दात केसरकर यांनी राणेंवर टीका केली आहे. 

दरम्यान, राणेंना जर भाजपमध्ये प्रवेश मिळाला तर शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असू शकतो. दुसरीकडे भाजपला याचा फायदाही होऊ शकतो. कारण कोकणात शिवसेनेप्रमाणेच पक्ष वाढविण्यास राणेंचा भाजपला फायदा होऊ शकतो. त्यामुळे विधानसभेत जर शिवसेना-भाजप युती झाली नाही तर शिवसेनेविरोधात प्रचार करण्यासाठी राणे हे भाजपकडे प्रमुख अस्त्र असू शकतात. या सगळ्याचा विचार करुनच भाजपही राणेंबाबत काय तो नेमका विचार शकते. 

शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपाबाबत अद्याप चर्चा सुरु झालेली नाही. त्यामुळे ही चर्चा सुरु झाल्यावर राजकारणाला खऱ्या अर्थाने रंग चढणार आहे. अशावेळी भाजप आता राणेंबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी