सरकारी कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारचं अत्यंत मोठं गिफ्ट!

मुंबई
रोहित गोळे
Updated Feb 12, 2020 | 16:04 IST

Five Days Week: ठाकरे सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्याचा थेट परिणाम राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे.

thackeray government approves five days week demand of government employees  
सरकारी कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारचं अत्यंत मोठं गिफ्ट!  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे पाच दिवसांचा आठवडा, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
  • सरकारी कर्मचाऱ्यांची अनेक दिवसांची मागणी ठाकरे सरकारने केली पूर्ण
  • पाच दिवसांचा आठवडा झाल्याने कामाचे तास वाढणार

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आजच्या (१२ फेब्रुवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने एक अतिशय मोठा असा निर्णय घेतला आहे. गेली अनेक वर्ष राज्य सरकारी कर्मचारी हे जी मागणी करत होते ती मागणी अखेर नव्या सरकारने मान्य केली आहे. पाच दिवसांचा आठवडा असावा अशी मागणी गेली अनेक वर्ष राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून सुरु होती. त्यांच्या याच मागणीवर आज शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.  मंत्रिमंडळ बैठकीत आज त्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला असून त्यांची अंमलबजावणी ही २९ फेब्रुवारीपासून होणार आहे. यामुळे आता प्रत्येक आठवड्यातील शनिवार आणि रविवार सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. 

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाच या मागणीसाठी कर्मचाऱ्यांकडून जोर लावण्यात आला होता. त्यावेळी अशीही चर्चा होती की, निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार पाच दिवसांचा आठवडा करण्याची शक्यता आहे. मात्र, त्यावेळेस याबाबत निवडणुकीच्या शेवटपर्यंत निर्णय झालाच नव्हता. मात्र, आता ठाकरे सरकारने या निर्णयाला मंजुरी देऊन कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. 

सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दुसरा आणि चौथा आठवडा पाच दिवसाचा आहे. मात्र, महिन्यातील सगळे आठवडे हे पाच दिवस कामाचेच असावेत अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली होती. ज्याला आजच्या मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, पाच दिवसांचा आठवडा झाला असला तरीही आता कर्माचाऱ्यांच्या कामाचे तास मात्र वाढणार आहेत. पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा अशी मागणी करताना कर्मचारी संघटनांनी सरकारकडे असा दावा केला होता की, दररोजच्या कामाचे तास वाढवल्यास त्यामुळे अधिक कामं होतील, संपूर्ण वर्षात कामाचे देखील तास वाढतील. त्यामुळे मंत्रिमंडळाने हाच दावा लक्षात घेऊन अखेर या मागणीला हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, आता या निर्णयाचा संपूर्ण राज्यातील सरकारी कामकाजावर नेमका काय परिणाम होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कारण कामाचे तास जरी वाढले तरी कर्मचारी जनतेची कामं कशा पद्धतीने करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा, सातव्या वेतन आयोगातील वाहतूक भत्त्याप्रमाणे भत्ते, सेवानिवृत्तीचं वय ६० वर्ष यासारख्या विविध १८ मागण्या करण्यात आल्या होत्या. ज्यापैकी पाच दिवसांच्या आठवड्याबाबत निर्णय घेण्यात आला. 

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसाचा आठवडा आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. जी आता मान्य झाली आहे.  यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय हे ५८ वर्षांवरुन ६० वर्षे करण्यात यावं ही मागणीही सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी