सोमय्यांवर मुख्यमंत्री कार्यालय नाही तर गृहमंत्रालयानं कारवाई केली: संजय राऊत

मुंबई
भरत जाधव
Updated Sep 20, 2021 | 15:26 IST

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा कोणताही संबंध नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत अ

Sanjay Raut
सोमय्यांवर मुख्यमंत्री कार्यालय नाही तर गृहमंत्रालयानं कारवाई केली  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आरोप करणाऱ्यांवर काल जी काही कारवाई झाली ती गृहमंत्रालयाने केली आहे. - संजय राऊत.
  • विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.
  • लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणे हा विरोक्षी पक्षाचा उपक्रम

मुंबई :  मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील घोटाळ्याचा अधिकचा तपशील घेण्यासाठी कोल्हापूरला निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी मुंबईच्या रेल्वे स्थानकावर अडवलं. धक्काबुक्की करण्यात आली असा आरोप सोमय्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा कोणताही संबंध नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 

गृहमंत्रालयाला जर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे असं वाटलं असेल तर त्यांनी तशी कारवाई केली असेल असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी कारवाईसंबंधी चर्चा केली होती. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. “तुमच्याकडे पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस, तपास यंत्रणा आहेत.

महाराष्ट्र पोलीस दल, राज्यातील तपास संस्था निष्पक्षपणे तपास करत असतात. पण तुम्ही केंद्र सरकारच्या आदेशावर महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर, प्रमुख लोकांवर आरोप करत असाल आणि त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर गृहमंत्रालय कारवाई करू शकते. त्याची आता राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याची गरज नाही. मी मुख्यमंत्र्यांशी याविषयी बोललो असून याचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच गृहमंत्रालयाला जर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे, असे वाटले असेल तर त्यांनी तशी कारवाई केली असेल असेही म्हटले,” असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

“आरोप करणाऱ्यांवर काल जी काही कारवाई झाली ती गृहमंत्रालयाने केली आहे. त्यामध्ये आकस आणि सूड या शब्दांचा वापर करू नये. मी पूर्ण माहिती घेतली असून गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न निर्माण, होईल असे वाटले. त्यातून ही कारवाई झाली असून यासंबंधी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाहीत, असं राऊतांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्र राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न

“कालपासून जे काही घडत आहे किंवा घडवले जात आहे ते विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारचे आरोप करुन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणे हा गेल्या काही दिवसांपासून विरोक्षी पक्षाकडून उपक्रम राबवला जात आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी