'निसर्ग' आणखी कोपला, चक्रीवादळ पूर्ण क्षमतेने अलिबागच्या दिशेने

मुंबई
रोहित गोळे
Updated Jun 03, 2020 | 11:56 IST

निसर्ग चक्रीवादळ हे आता पूर्ण क्षमतेने अलिबागच्या दिशेने सरकत असून त्यामुळे त्याचं रौद्र रुप येता काही तासात पाहायला मिळू शकतं. 

the nisarga cyclone is moving towards alibag at full capacity
'निसर्ग' आणखी कोपला, चक्रीवादळ पूर्ण क्षमतेने अलिबागच्या दिशेने   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • निसर्ग चक्रीवादळ आणखी वेगाने झेपावतंय अलिबागच्या दिशेने
  • चक्रीवादळ धडकल्यानंतर ११५-१२० ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता
  • चक्रीवादाळाला तोंड देण्यासाठी प्रशासन देखील सज्ज

मुंबई: 'निसर्ग' चक्रीवादळ हे आता लवकरच महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहेत कारण हे वादळ आता अलिबागपासून अवघ्या १३० किमी दूर आहे. दरम्यान, हे चक्रीवादळ दुप्पट वेगाने येत असून पूर्ण क्षमतेने अलिबागच्या दिशेने झेपावत आहेत. त्यामुळे 'निसर्ग' आणखी कोपल्याचं चित्र सध्या तरी दिसतं आहे. 

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ मुरुड आणि अलिबागदरम्यान धडकण्याची शक्यता आहेत. त्यामुळे या भागातील किनारपट्टीजवळील अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, हे वादळ जेव्हा समुद्रकिनारी धडकेल तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी ११५ ते १२० एवढा प्रचंड असणार आहे. म्हणजेच हे वादळ पूर्ण क्षमतेने आणि रौद्र रुप धारण करुन जमिनीच्या दिशेने येत आहे. बऱ्याचदा असंही होतं की, चक्रीवादळ हे किनाऱ्याच्या दिशेने येता-येता काहीसं मंदावतं. त्यामुळे वारे वाहण्याचा वेग देखील कमी होतो. निसर्ग चक्रीवादळाबाबत देखील असंच काहीसं होतं का याकडे हवामान तज्ज्ञांचं सतत लक्ष आहे. मात्र, ताज्या माहितीनुसार, हे वादळ पूर्ण क्षमतेने किनाऱ्यावर धडकून पुढे सरसावणार आहे. 

दुसरीकडे या संकटाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून एनडीआरएफच्या जवानांनी किनारपट्टी जवळ राहणाऱ्या अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. याशिवाय येथील अनेक ग्रामीण भागातील तरुणांना संकट काळात कशाप्रकारे मदत करायची याचं देखील प्रशिक्षण दिलं आहे. त्यामुळे या वादळाला तोंड देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालं आहे. 

महाराष्ट्रात १२९ वर्षानंतर घडणार असं काही!

दरम्यान, जसजसं वादळ पुढे सरकत आहे तसतसा वाऱ्याच वेग आणि पावसाचा जोर देखील वाढत आहे. हे वादळ अलिबागच्या जवळपास धडकणार असून पुढे मुंबईहून धुळ्यापर्यंत प्रवास करणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या १२९ वर्षात पहिल्यांदाच चक्रीवादळ हे मुंबई आणि महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हे वादळ नेमकं किती घातक ठरु शकते हे पुढील काही काळातच समजेल. मात्र, असं असलं तरीही प्रशासन देखील पूर्ण तयारीनिशी या संकटावर मात करण्यासाठी सज्ज झालं आहे. 

चक्रीवादळाची धडक

चक्रीवादळ प्रमुख्याने मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना धडक देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील मुरुड या भागाला चक्रीवादळाची पहिली धडक बसण्याची शक्यता आहे.

मदतीसाठी मोठी टीम

चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी आतापर्यंत एनडीआरएफच्या (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) १५ आणि एसडीआरएफच्या (राज्य आपत्ती निवारण दल) ४ टीम महाराष्ट्रात नियुक्त करण्यात आल्या आहेत. आणखी ५ टीम राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मंत्रालयात २४ तास कार्यरत असलेला नियंत्रण कक्ष काम करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सैन्याची तिन्ही दले, तटरक्षक दल, एनडीआरएफ, अग्नीशमन दल, स्थानिक प्रशासन, स्थानिक सरकारी आरोग्य विभाग आणि पोलीस परस्पर समन्वय राखून काम करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी