राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा आणखी वाढला, सकाळीच सापडेल पॉझिटिव्ह रुग्ण 

मुंबई
रोहित गोळे
Updated Mar 19, 2020 | 11:38 IST

राज्यात कोरोना बाधितांची संख्या आणखी वाढली आहे. कारण की, आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. 

the number of coronavirus patients in the state increased even further 2 positive patient found   
राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा आणखी वाढला, सकाळीच सापडेल पॉझिटिव्ह रुग्ण   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: राज्यात कोरोना बाधितांची संख्या ही सतत वाढत असल्याचं दिसून येत आहे. आज (गुरुवार) सकाळीच राज्यात आणखी दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता राज्यात एकूण ४७ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. 

महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, यूकेहून परतलेल्या मुंबईतील २२ वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर दुसरीकडे उल्हासनगरमधील एका ४९ वर्षीय महिलेला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आढळून आलं आहे. ही महिला उल्हासनगरमधील असल्याचं समजतं आहे. आज सकाळीच या दोन नव्या रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आता राज्यात कोरोनाचा आकडा ४७ पर्यंत पोहचला आहे.  

देशात कोरोना बाधितांची संख्या १७५ वर 

देशात कोरोना-संक्रमित लोकांची संख्या १७५ वर पोहोचली आहे. त्यापैकी १४९ लोक रुग्णालयात दाखल आहेत. तर १५ जण बरे झाले आहेत. तर तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न सध्या सुरु आहेत.

मुंबई, रत्नागिरी, पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे रुग्ण 

दरम्यान, त्याआधी काल (बुधवार) पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि रत्नागिरीत प्रत्येकी एक असे तीन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. त्यामुळे काल राज्यात करोनाबाधितांची संख्या आता ४२ वरून ४५ वर झाली होती. देशात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. पुणे शहरात 8, पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण ११ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांची संख्या १९ वर पोहचली आहे.  

पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण 

पिंपरी चिंचवडमधील २१ वर्षीय तरुणाने गेल्या काही दिवसात फिलिपाईन्स, सिंगापूर आणि कोलंबो असा प्रवास केला होता. तर रत्नागिरीतील ५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, या व्यक्तीने दुबई प्रवास केला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा हा पहिला रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता अधिकच खबरदारी घेतली जात आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नवीन भोसरी रुग्णालयामधून एकूण ९२ व्यक्तींचे कोरोना चाचणीकरीता घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले होते. त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून उर्वरीत चार व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे : 

  1. पिंपरी चिंचवड मनपा - ११    
  2. पुणे मनपा ८ 
  3. मुंबई   ९ 
  4. नागपूर  ४ 
  5. यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण प्रत्येकी ३, 
  6. रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, उल्हासनगर येथे प्रत्येकी १  
  7. एकूण ४७ 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी