आता फक्त 'एवढ्या' रुपयात करता येणार कोरोना टेस्ट, दर आणखी घटले

Corona Test: राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये चौथ्यांदा घट करण्यात आली आहे. कोरोना चाचणीसाठी फक्त ९८० रुपये मोजावे लागणार आहेत. या नव्या दर निश्चितीबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 rajesh tope
आता फक्त 'एवढ्या' रुपयात करता येणार कोरोना टेस्ट, दर आणखी घटले  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • कोरोना चाचणीच्या दरामध्ये राज्य सरकारने पुन्हा एकदा केली घट
  • आता ९८० रुपयात करता येणार कोरोनाची चाचणी
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे (Corona Test) दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी सुमारे २०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी ९८०, १४०० आणि १८०० रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही. ४५०० रुपयांवरुन ९८० रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज (२६ ऑक्टोबर) सांगितले.

कोरोना चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर ९८० रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करुन तपासणी करण्यासाठी १४०० रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी १८०० रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे. सामान्य माणूस केंद्र स्थानी ठेवून राज्य शासनाने सातत्याने दरामध्ये घट आणत रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात आला असून प्रति दहा लाख लोकसंख्येमागे ७० हजार चाचण्या केल्या जात असून त्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जेणेकरुन कोरोनावर अधिक नियंत्रण मिळविता येईल. राज्यभरात सुधारित दरानुसार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्ण संख्या ही कमी होत असल्याचे दिसून येत आहे. जी निश्चितच दिलासादायक बाब आहे. मात्र, असं असलं तरीही कोरोना संपूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी