गृह कर्जदारांसाठी खुशखबर... हाऊसिंग फायनान्सही व्याजदर कपात करण्याची शक्यता

मुंबई
Updated Jan 02, 2020 | 18:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

एलआयसी हाउसिंग फायनान्सने काही दिवसांपूर्वीच व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी, पीएनबी हाउसिंग फायनान्स आणि इंडियाबुल्स हाउसिंग व्याजदरात कपात करण्याचा विचार करत आ

The state bank cut interest rates on home loans, finance companies can reduce ROI
गृह कर्जदारांसाठी खुशखबर... हाऊसिंग फायनान्सही व्याजदर कपात करण्याची शक्यता  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • व्याजदर कमी करण्यासाठी हाउसिंग फायनान्स कंपन्यांच्या ऍसेट लायबिलिटी समित्यांची या महिन्यात बैठक होण्याची शक्यता आहे.
  • खासगी वित्त कंपन्यांमध्ये असलेल्या दबावामुळे गृहकर्ज देणाऱ्या खासगी वित्त कंपन्यांना व्याजदरात घट करणे भाग आहे.
  • एलआयसी हाउसिंग फायनान्सने काही दिवसांपूर्वीच व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केली आहे.

मुंबई: काही दिवसांपूर्वीच स्टेट बॅंक ऑफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली. त्यानंतर सर्वच गृहकर्ज पुरवठादारांनी व्याजदर कपातीचा विचार करण्यास सुरूवात केली आहे. बॅंकेव्यतिरिक्त हाउसिंग फायनान्स कंपन्या गृहकर्ज देतात. मात्र बॅंकेच्या आणि या कंपन्यांच्या व्याजदरात फरक असतो. आता या कंपन्यादेखील गृहकर्जावरील व्याजदर पाव टक्क्यांनी कमी करण्याचा विचार करत आहे. व्याजदर कमी करण्यासाठी हाउसिंग फायनान्स कंपन्यांच्या ऍसेट लायबिलिटी समित्यांची या महिन्यात बैठक होण्याची शक्यता आहे.

एलआयसी हाउसिंग फायनान्सने काही दिवसांपूर्वीच व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी, पीएनबी हाउसिंग फायनान्स आणि इंडियाबुल्स हाउसिंग व्याजदरात कपात करण्याचा विचार करत आहे. खासगी वित्त कंपन्यांमध्ये असलेल्या दबावामुळे गृहकर्ज देणाऱ्या खासगी वित्त कंपन्यांना व्याजदरात घट करणे भाग आहे. व्याजदरात होणारी कपात ही पूर्णपणे कंपन्यांच्या उधारीवर अवलंबून आहे. मोजक्या कंपन्या सोडल्या तर उर्वरित कंपन्यांना स्वस्तात निधी प्राप्त करणे अवघड असल्याचे इक्रा रेटिंग्जचे वरिष्ठ उपाध्यक्ष कार्तिक श्रीनिवासन यांनी सांगितले.

खासगी वित्त कंपन्यांचे व्याजदर जवळपास एकसारखे असल्याने त्यांच्यात कपातीसाठी स्पर्धा होण्याची दाट शक्यता आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्सतर्फे ज्या अर्जांमध्ये महिलेचे नाव आहे त्या अर्जांना कमी दर आकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. स्पर्धा, किंमत, बाजारातील मागणी आणि उपलब्ध असणाऱ्या सर्व उत्पादने या बाह्य घटकांचा विचार करत व्याजदर कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. चाली आर्थिक वर्षात गृहकर्ज वितरित करणाऱ्या कंपन्यांच्या वृद्धिदरात कमालीची घट झाली आहे. परिणामी त्यांचा बाजारातील हिस्सा प्राप्त करण्यात बॅंकांना यश आले आहे.

इक्रा रेटिंगच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरच्या अखेरच्या तिमाहीत एकूण वितरित गृहकर्ज १० टक्क्यांनी वाढून १९.५ लाख कोटी रूपयांवर गेले आहे. एकूण वितरित गृहकर्जांमध्ये हाउसिंग फायनान्स कंपन्या आणि बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांचा वाटा ३६ टक्के होता. हा हिस्सा गेल्या वर्षी ३८ टक्के होता. तसेच बॅंकांनी वितरित केलेल्या कर्जाचा हिस्सा ६२ टक्क्यांवरून ६४ टक्क्यांवर गेला आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी