महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 335 वर, मुंबई आणि बुलढाण्यात नवा रुग्ण

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 01, 2020 | 21:09 IST

राज्यात आज दिवसभरात कोरोना व्हायरसचे  33 नवे रुग्ण आढळलेत. आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातली माहिती दिली आहे. 14 रुग्ण मुंबईत तर 1 रुग्ण बुलढाण्यात पॉझिटिव्ह आढळल्याने 320 वरुन रुग्णांची संख्या थेट 335 वर गेली.

Coronavirus positive cases in the Maharashtra
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 335 वर, मुंबई आणि बुलढाण्यात नवा रुग्ण 

मुंबईः महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 335 वर पोहचली आहे.  राज्यात आज दिवसभरात कोरोना व्हायरसचे  33 नवे रुग्ण आढळलेत. आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातली माहिती दिली आहे.  14 रुग्ण मुंबईत तर 1 रुग्ण बुलढाण्यात पॉझिटिव्ह आढळल्याने 320 वरुन रुग्णांची संख्या थेट 335 वर गेली आहे. रुग्णसंख्या चांगलीच वाढते आहे ही देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. 

आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीत कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.  हा रुग्ण 56 वर्षांचा असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा रुग्ण धारावीतील शाहू नगर येथे आढळून आला. त्याच्याघरातील 8 ते 10 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. याशिवाय हा रुग्ण राहत असलेल्या इमारतीला सील करण्यात येत आहे. त्यासोबतच आज दिवसभरात राज्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबईत एक 75 वर्षीय व्यक्तीचा आणि दुसरा 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू आज झाला. तर तिसरा मृत्यू पालघरमध्ये झाला. या व्यक्तीचं वय 50 वर्ष होतं. या तिन्ही रुग्णांनी कोणत्याही प्रकारची प्रवास केला नव्हता अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 

41 जणांना घरी सोडले तर 13 जणांचा मृत्यू    

राज्यात आज एकूण 705 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 7126 नमुन्यांपैकी 6456 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ३३५ जण पॉझिटिव्ह आलेत. आतापर्यंत 41 कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 24  हजार 818 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 1828 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

 • मुंबई – 181
 • पुणे – 38
 • पिंपरी चिंचवड – 12
 • सांगली – 25
 • नागपूर –  16
 • कल्याण – 10
 • नवी मुंबई – 8
 • अहमदनगर – 8
 • ठाणे – 8
 • वसई विरार – 6
 • यवतमाळ – 4
 • बुलडाणा – 4
 • पनवेल – 2
 • सातारा – 2
 • कोल्हापूर – 2
 • पालघर- 1
 • उल्हासनगर – 1
 • गोंदिया – 1
 • औरंगाबाद – 1
 • सिंधुदुर्ग – 1
 • रत्नागिरी – 1
 • जळगाव- 1
 • नाशिक – 1
 • इतर राज्य (गुजरात) – 1

एकूण 335

 

आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून धक्कादायक खुलासा

मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.  गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत कोरोना  रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचदरम्यान राजेश टोपे यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे.  कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात  जवळपास 5 हजार पेक्षाही जास्त नागरिक आले असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

पुढील काही दिवसात मुंबईत कोरोनाग्रस्तांचा  आकडा वाढण्याची भीती आरोग्यमंत्र्यांनी वर्तवली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात जवळपास 5 हजार पेक्षाही जास्त नागरिक आले असून एमओएच टीमच्या माध्यमातून या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या लोकांची यादी आली आहे. या यादीत 5,343 जणांची नावे आहेत. या सर्वांवर अतिशय गांभीर्याने लक्ष ठेवलं जात आहे. त्यासाठी 4 हजार जणांचं पथक संपूर्ण मुंबईत कार्यरत आहे, अशी माहिती  राजेश टोपे यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी