विखेंवर तूर्तास कारवाई नाहीच, राम शिंदेंच्या तक्रारीला भाजपकडून मिळालं 'हे' उत्तर 

मुंबई
Updated Dec 27, 2019 | 15:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vikhe vs Shinde: राधाकृष्ण विखे-पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी माजी मंत्री राम शिंदे यांनी पक्षाचे दरवाजे ठोठावले. पण तूर्तास तरी पक्षाने विखेंवर काहीही कारवाई केलेली नाही. 

there is no immediate action on vikhe patil report will be submitted after ram shinde's complaint and action will be taken later bjp 
विखेंवर तूर्तास कारवाई नाहीच, राम शिंदेंच्या तक्रारीला भाजपकडून मिळालं 'हे' उत्तर   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • विखे पिता-पुत्रांवर भाजपकडून कोणतीही कारवाई नाही!
  • संघटनमंत्री विजय पुराणिक अहवाल सादर करणार
  • राम शिंदेच्या तक्रारीनंतर भाजप विखेंवर करणार कारवाई?

मुंबई: विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विखे-पाटील पिता-पुत्रांविषयी नगर जिल्ह्यात प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात भाजपला प्रचंड मोठा धक्का बसला. कारण नगर जिल्ह्यातील भाजपच्या अनेक प्रस्थापित आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. एवढंच नव्हे तर कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांचा देखील पराभव झाला. त्यानंतर जिल्ह्यातील या सर्वच आमदारांनी आपल्या पराभवासाठी थेट विखे-पाटील पिता-पुत्रांनाच दोषी ठरवलं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी या सर्वांनी केली होती. अखेर आज मुंबईतील भाजप कार्यालयात याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत पक्ष नेतृत्वाने गंभीर दखल घेतलं असल्याचं राम शिंदे यांनी सांगितलं आहे. पण अद्याप तरी विखे-पाटलांकडून पक्षाने कारवाई केलेली नाही. 

नगर जिल्ह्यातील भाजपचे पराभूत आमदार आणि विखे-पाटील पिता-पुत्र यांनी मुंबईतील भाजप कार्यालयात समोरासमोर येत आपआपल्या बाजू मांडल्या. त्यानंतर राम शिंदे यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केलं की, पक्षाने आम्ही केलेल्या तक्रारीची दखल घेतली आहे. 

पाहा पक्षाच्या बैठकीनंतर राम शिंदे नेमकं काय म्हणाले:

'नगर जिल्ह्याच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी मुख्यत्वे: विधानसभेत नगर जिल्ह्यातील पराभवाबाबत चर्चा झाली. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आपल्या पूर्वनियोजीत कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाही. पण संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या समक्ष दोन्ही बाजू मांडण्यात आल्या. त्यामुळे आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. याबाबत विजय पुराणिक हे पुढील कारवाईसाठी एक वस्तूनिष्ठ अहवाल तयार करुन तो पक्षाला सादर करतील. हा अहवाल सादर झाल्यानंतर नेतृत्व योग्य तो निर्णय घेऊन निश्चित ती कारवाई करेल. दरम्यान, जिल्ह्यात आता लवकरच इतर निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मी आणि विखे-पाटील यांच्यात उद्या बैठक होणार आहे.' अशी माहिती राम शिंदे यांनी दिली. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राम शिंदे यांनी थेट माध्यमांसमोर येऊन विखे-पाटलांबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती. याच गोष्टीवरुन विखे-पाटलांनी देखील राम शिंदेना आज टोला लगावला होता. 'नाराजी ही पक्षाकडे मांडायची असते मीडियासमोर नाही.' असं विखे-पाटील म्हणाले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी