Eknath Shinde News: एकनाथ शिंदेंच्या नाराजीची ही आहेत प्रमुख कारणे 

मुंबई
Updated Jun 21, 2022 | 11:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Eknath Shinde | शिवसेनेचे महत्वाचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल झाल्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ११ आमदार गुजरातच्या सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

These are the main reasons for the displeasure of Shiv Sena leader and Minister Eknath Shinde
एकनाथ शिंदेंच्या नाराजीची ही आहेत प्रमुख कारणे   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेचे चार मंत्रीही 'नॉट रिचेबल'.
  • शिवसेनेतील बंडाने राज्याच्या राजकारणात खळबळ.
  • शिंदेच्या पुढील भूमिकेकडे राज्यांचे लक्ष.

Eknath Shinde | मुंबई : शिवसेनेचे महत्वाचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल झाल्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ११ आमदार गुजरातच्या सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या पडत्या काळात शिवसेनेसोबत राहिलेले कट्टर शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे का नाराज होते याची काही कारणे शिवसेनेतून समोर आले आहेत. (These are the main reasons for the displeasure of Shiv Sena leader and Minister Eknath Shinde). 
 
राज्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसल्यानंतर मोठ्या घडामोडी राज्याच्या राजकारणात सुरु झाल्या आहेत. शिवसेना आणि समर्थक आमदारांची १२ मते फुटल्याचा प्रकार काल उघडकीस आला. त्यानंतर काल संध्याकाळपासूनच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते आणि आता त्यांच्यासोबत काही आमदारही नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदेंसोबत नेमके किती आमदार आहेत याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नसली तरी  काही ठिकाणी १३ तर काही माहितीनुसार १७ आमदार फुटल्याची बातमी समोर येत आहेत. तर एकूण ३५ आमदार फुटल्याचा दावा गुजरात भाजप करत आहेत. शिंदे यांच्या नाराजीची काही कारणे आता शिवसेनेच्या आतून समोर आली आहेत. 

अधिक वाचा : फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

शिंदेच्या खात्यात हस्तक्षेप

शिवसेनेच्या मंत्रिपदांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून एकनाथ शिंदेंकडे पाहिलं जात असलं तरी त्यांना मिळालेल्या मंत्रिपदामध्ये इतर दोन मंत्री सातत्यानं हस्तक्षेप करत होते. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. नगरविकास मंत्रिपद असूनही मनमोकळेपणानं काम करता येत नसल्याची शिंदे यांची नाराजी होती असं सांगितलं जात आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून वारंवार परवानगी

नगरविकास मंत्रीपद असूनही कोणताही निर्णय घेताना किंवा फाइलवर सही करण्याआधी एकनाथ शिंदे यांना प्रत्येकवेळी मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घेण्यास सांगितलं जात होतं. त्यांच्याच खात्याचे सचिव आणि आयएएस अधिकाऱ्यांकडून तसं एकनाथ शिंदे यांना सांगण्यात येत होतं. त्यामुळे शिंदे नाराज होते.

अजित पवारांसोबत स्पर्धा

राज्यसभेत अजित पवारांच्या गटाने फडणवीसांना मदत केली अशी चर्चा होती. त्यामुळे अजित पवारांविरुद्धच्या स्पर्धेच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांनी मोठं पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत संवादाचा अभाव

सरकारच्या सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उत्तम संवाद होता. पण कालांतरानं चित्र पालटलं आणि दोन्ही नेत्यांमध्ये संवाद कमी झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत संवाद कमी झाल्यानंतर एकनाथ शिंदे देखील दुरावले गेले होते. शिवसेनेचे इतर काही नेते उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय बनले पण एकनाथ शिंदे यांची आपल्याला डावललं जातंय अशी भावना निर्माण होऊ लागली. याचाच परिणाम आज पाहायला मिळत आहे.

आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाईंना अधिक महत्व

उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांना सरकारमध्ये अधिक महत्व दिलं जात असल्याच्या मुद्द्यावरुनही एकनाथ शिंदे नाराज होते असं सांगण्यात येत आहे. पक्षाबाबतचे निर्णय घेताना एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेतलं जात नव्हतं याची खंत त्यांच्या मनात होती.

युवा नेत्यांना अधिक जबाबदारी

राज्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी देताना एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेण्यात आलं नाही. पक्षानं या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास न दाखवता संपूर्ण जबाबदारी आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्यासह युवासेनेचे नेते सुरज चव्हाण यांच्याकडे दिली होती. याचीच खंत एकनाथ शिंदेंना होती.

संजय राऊतांच्या वारंवारच्या वक्तव्याने त्रस्त

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा आणि त्यांच्या वक्तव्यांवर एकनाथ शिंदे नाराज होते अशी माहिती समोर आली आहे. संजय राऊत प्रत्येकवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीच बाजू मांडत असून शिवसेनेला याचा फटका बसत असल्याचं मत एकनाथ शिंदेंचं होतं. याबाबतही एकनाथ शिंदे नाराज होते.

शिंदेंसह २५ आमदार फुटले

एकनाथ शिंदे सूरतमधील मेरेडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आल्यानंतर आतापर्यंत शिवसेनेचे तब्बल २५ ते ३० आमदार नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षात उभी फूट निर्माण झाली आहे. आता उद्धव ठाकरे पक्षाला कसं सांभाळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तसंच एकनाथ शिंदे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. ते नेमके कोणती भूमिका मांडतात यातूनच सर्व चित्र स्पष्ट होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी