'ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल', राऊतांनी घेतली पवारांची मुलाखत!

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 07, 2020 | 14:49 IST

sanjay raut interviewed sharad pawar: सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांची एक विशेष मुलाखत घेतली असून ही मुलाखत राजकीय क्षेत्रात खळबळ माजवेल असा दावा त्यांनी केला आहे.

sharad pawar and sanjay raut
शरद पवार आणि संजय राऊत  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • शरद पवार यांची विशेष मुलाखत लवकरच होणार प्रसिद्ध
  • सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट
  • पवाराची ही मुलाखत राजकीय क्षेत्रात खळबळ माजवेल, राऊतांचा दावा

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर नवं सरकार सत्तेत येऊन आता जवळजवळ सहा महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्यापही या दरम्यान घडलेल्या राजकारणावर चर्चा सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले होते. त्याचनंतर आता आणखी एक मुलाखतीमुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. ही मुलाखत असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची.

शरद पवार यांची मुलाखत सामनाचे कार्यक्रारी संपादक आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतली आहे. ही राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. असा दावा स्वत: संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्वीट देखील केलं आहे. या मुलाखतीत शरद पवार हे चीनपासून महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीवर जोरदार बोलले असल्याचंही राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे आता या मुलाखतीत शरद पवार नेमका कोणता गौप्यस्फोट करणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला होता. यावेळी फडणवीस असं म्हणाले होते की, 'अजित पवार यांनी भाजपला दिलेला पाठिंबा हा त्यांच्या एकट्याचा निर्णय नव्हता. तर तो राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा निर्णय होता. राष्ट्रवादीचं नेतृत्व म्हणजे अजित पवार नाही.' 

पुढे फडणवीस असंही म्हणाले होते की, 'जेव्हा आम्हाला समजलं की, शिवसेना आमच्यासोबत सत्तेत येण्यास तयार नाही तेव्हा आम्ही आमच्यासमोर असणाऱ्या पर्यायांचा विचार केला आणि त्यावेळी राष्ट्रवादीने आमच्यासोबत येण्याचा कौल दिला. याबाबत दोन महत्त्वाच्या बैठका झाल्या. ज्यामध्ये शरद पवार हे देखील हजर होते. एका बैठकीला मी हजर होतो आणि दुसऱ्या बैठकीला नव्हतं. पण त्यावेळी ७२ तासांचं जे सरकार अस्तित्वात होतं तो फक्त अजित पवारांचा निर्णय नव्हता एवढं निश्चित.'

दरम्यान, आता फडणवीस यांच्या या वक्तव्याबाबत शरद पवार मुलाखतीत काही बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की, फडणवीसांनी केलेल्या या दाव्यानंतर राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी