प्रचार अंतिम टप्प्यात, दिग्गज मंडळींची आज 'या' ठिकाणी तोफ धडाडणार

मुंबई
पूजा विचारे
Updated Oct 18, 2019 | 08:34 IST

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीला अवघे दोन दिवस उरले असताना नेते मंडळी जोरदार प्रचार करत आहेत. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.आज कोणाकोणाच्या कुठे प्रचारसभा असणार आहेत, जाणून घ्या.

Party leader's
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा झंझावात  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.
  • येत्या 21 तारखेला सर्वच पक्षांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहेत.
  • पंतप्रधान मोदी, काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे आज महाराष्ट्रात
  • जाणून घ्या कोणाच्या कधी आणि कुठे सभा असणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. येत्या 21 तारखेला सर्वच पक्षांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहेत. त्यातच राज्यभर दररोज दिग्गजांच्या प्रचारसभा गाजत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, गृहमंत्री अमित शहा,  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बऱ्याच दिग्गजांचे राज्यभर प्रचार दौरे सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. आता केवळ उद्याचा दिवस प्रचार करता येणार असल्यानं सर्वच पक्षाकडून झंझावात प्रचार सुरू आहे. रोजच्याप्रमाणे आजही दिग्गज महाराष्ट्राच आपल्या प्रचार सभा गाजवणार आहेत. जाणून घ्या कोणाच्या कधी आणि कुठे सभा असणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर

आज महायतुचची महासभा आज वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे होणार आहे. या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर असतील. संध्याकाळी 6 वाजता ही सभा होणार आहे. या सभेला शिवसेना- भाजपसह घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात प्रचार दौरा करणार आहेत. आज शहांच्या चार सभा होणार आहेत. चंद्रपुर, गडचिरोली, यवतमाळ, नागपूर याठिकाणी या सभांचा आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपुरातील अहेरी, गडचिरोलीतील राजुरा, यवतमाळ येथील वणी आणि नागपुरातील खापरखेडा शहा संबोधित करतील. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 

नितीन गडकरी आज नागपूर आणि वर्धा येथे प्रचार दौरा करणार आहे. सावनेर, हिंगणा, गोंदिया, दुर्गा चौक (कामठी), गणेशपेठ (मध्य नागपूर), डिप्टी सिग्नल चौक (पूर्व नागपूर), जरिपटका (उत्तर नागपूर) या ठिकाणी गडकरींच्या सभा असतील. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज तीन ठिकाणी सभा होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात दोन तर भंडाऱ्यात एक सभा होईल. जलालखेडा, कन्हान, तुमसरमध्ये या सभा होती. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या 2 ठिकाणी सभा होतील. सातऱ्यात दहिवडी, नगरच्या कर्जतमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होईल. 

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार 

शरद पवार यांच्या आज चार सभा होणार आहेत. पंढरपूर, अंबाजोगाई, पाटण, सातारा या ठिकाणी पवारांच्या प्रचाराचं आयोजन करण्यात आलं आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडणार आहे. राज ठाकरे यांची पहिली सभा कोथरूडच्या बेलके नगर चौकात होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता ही सभा असेल. त्यानंतर बंटर विद्यालय वाहनतळ, हडपसरला राज यांची दुसरी सभा रात्री 7.30 वाजता असेल. 

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे 

काँग्रेस पक्षाचा प्रचार करण्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे गुरूवारपासून महाराष्ट्रात प्रचार दौऱ्यासाठी हजर आहेत. काल त्यांच्या सोलापूर आणि पुण्यात सभा पार पडल्या. आज ज्योतिरादित्य सांगली, कोल्हापुरात प्रचार दौरा करतील. 

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे 

वरळी मतदारसंघाचे उमेदवार आदित्य ठाकरे आज पुमे जिल्ह्यात प्रचार दौरा करणार आहेत. जेजुरी, भोर, जुन्नर, खेड-आळंदीत आदित्य ठाकरे हे प्रचार करताना आज दिसणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी