सर्वात मोठी बातमी: कोणत्याही क्षणी होणार खातेवाटप, अखेर तोडगा निघाला 

मुंबई
पूजा विचारे
Updated Jan 04, 2020 | 08:03 IST

30 डिसेंबर 2019 ला मंत्रिमंडळाचा विस्तार करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 36 नव्या मंत्र्यांचा समावेश केला. अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला आहे.  आज सकाळी किंवा दुपारपर्यंत खातेवाटप होईल अशी माहिती समोर येत आहे. 

MahaVikasAaghadi
कोणत्याही क्षणी होणार खातेवाटप, अखेर तोडगा निघाला  |  फोटो सौजन्य: Times Now

30 डिसेंबर 2019 ला मंत्रिमंडळाचा विस्तार करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 36 नव्या मंत्र्यांचा समावेश केला. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला 5 दिवस उलटून गेले तरी मंत्र्यांना खाती मिळालेली नाही आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राज्य सरकारच्या खातेवाटपावरून चर्चां सुरू असल्याचं बोललं जातं होतं. पण आता अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण आज कोणत्याही क्षणी खातेवाटप जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला आहे.  आज सकाळी किंवा दुपारपर्यंत खातेवाटप होईल अशी माहिती समोर येत आहे. 

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी सिल्वर ओकवर महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते हजर होते. या बैठकीत कोणते खाते कोणाकडे राहणार यावर अंतिम निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान या खातेवाटपाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हिरवा कंदिल दिला आहे. यावेळी काँग्रेसला बंदरे, खार जमिनी आणि सांस्कृतिक अशी तीन खाती देण्यात आलीत. दुसरीकडे अशी ही चर्चा आहे की, 4 वाढीव खात्यानंतर दिल्लीहून काँग्रेसची यादी येणार आहे. 

राष्ट्रवादीला माजी सैनिक कल्याण, क्रीडा व युवक कल्याण अशी दोन अतिरिक्त खाती देण्यात आलीत. तर कृषी आणि परिवहन खातं हे शिवसेनेकडे राहणार आहे. काँग्रेसनं केलेली कृषी खात्याची मागणी शिवसेनेनं फेटाळली आहे. तसंच पाहायला गेल्यास काँग्रेसला मंत्रिमंडळ विस्तारात सर्वात कमी खाती मिळाली आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खातं कायम असणार आहे. तर नितीन राऊत यांना ऊर्जा खातं तर अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खातं मिळण्याची शक्यता आहे. 

दरम्यान महाराष्ट्रविकास आघाडी सरकार नव्या खात्याची निर्मिती करण्याच्या विचारात आहे आणि ही नवी खाती शिवसेनेच्या मंत्र्यांना दिली जाणार असल्याची शक्यता आहे. मेट्रो रेल्वे, वाणिज्य, तीर्थक्षेत्र विकास आणि मुख्यमंत्री कार्यालय ही चार नवीन खाती तयार होऊ शकतात. या खात्यांविषयी प्राथमिक चर्चा झाल्याचं देखील समजतं आहे.

शिवसेनेच्या वाट्याला नगरविकास, परिवहन, उद्योग, कृषी अशी महत्त्वाची खाती आहेत. तर काँग्रेसच्या वाट्याला महसूल, शालेय शिक्षण, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम ही खाती दिलीत. राष्ट्रवादीला गृह, जलसंपदा, अर्थ अशी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. तर पालकमंत्र्यांचा फॉर्म्युला 14-12-10 हा असण्याची शक्यता आहे. त्यात फॉर्म्युल्यानुसार 14 जिल्ह्यांचे पालकमंत्री शिवसेनेचे असतील तर राष्ट्रवादीचे 12 आणि 10  काँग्रेसचे पालकमंत्री जिल्ह्यात असतील. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी