चुकूनही उद्या कोरोनाबाबत एप्रिल फूलचे मेसेज फॉरवर्ड करु नका, नाहीतर होईल...

मुंबई
पूजा विचारे
Updated Mar 31, 2020 | 16:06 IST

सोशल मीडियावर अनेक कोरोना विषाणू संबंधित खोटी माहिती पसरवली जात आहे. एक एप्रिलच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

Anil deshmukh
चुकूनही उद्या कोरोनाबाबत एप्रिल फूलचे मेसेज फॉरवर्ड करु नका  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबईः   दिवसेंदिवस देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात  आलं आहे. त्यातच राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वेगानं वाढ होत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा 232 वर जाऊन पोहोचला आहे. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक कोरोना विषाणू संबंधित खोटी माहिती पसरवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. एक एप्रिलच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

देशावर कोरोना विषाणूचे मोठे संकट आलं आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे 1 एप्रिलला कोरोना विषाणू यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे संभ्रम निर्माण करतील असे मेसेज टाकू नये, सोशल मीडियावर व्हायरल करू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

कोणीही नियमांचं उल्लंघन करून सोशल मीडियावर अफवा पसरवू नका, असं केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, लॉकडाऊन आणि कोरोनासंदर्भात अनेक अफवा सोशल मीडियावर वारंवार समोर येत आहेत अशा अफवांना बळी न पडू नका आणि घरी राहून आपली आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

गृहमंत्र्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. एप्रिल फूल करण्यासाठी अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर क्राईमच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं. 

उद्या एप्रिल  १ आहे. दर वर्षी आपण  एप्रिल फूलचे खूप जोक्स करतो.  पण कोरोना वायरस च्या संकटांशी लढताना थट्टेला स्थान नाही. सगळ्यांना अनुरोध की असंच करू नये.  अन्यथा पोलिस व सायबर सेल मार्फत कठोर कार्रवाई केली जाईल, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. 

पाहा राज्यातील रुग्णांचा आकडा किती? 

काल रात्री 11 वाजेपर्यंत राज्यात कोरोनाचे 220 रुग्ण होते. मात्र आज सकाळी नऊ वाजेपर्यंत या आकड्यात पुन्हा वाढ झाली. त्यामुळे आता राज्य शासनाची चिंता अधिक वाढली आहे. रात्रभरात राज्यात पाच नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. या सर्व रुग्णांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने आता राज्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 235 वर जाऊन पोहचली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी