राज्यात 24 तासांत नवे 352 रुग्ण, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2334 वर

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 13, 2020 | 22:37 IST

महाराष्ट्रात 352 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने ही संख्या आता 2334 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे 101 जणांचा मृत्यू झाल्याची बाब आरोग्य विभागाने दिली आहे. 

Corona virus positive
राज्यात 24 तासांत नवे 352 रुग्ण, रुग्णांची संख्या 2334 वर  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबईः  देशभरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज दुपारी 12 च्या दरम्यान आलेल्या संख्येनंतर महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या 2 हजाराच्या वर गेली होती.  त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहे. आताच समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 352 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने ही संख्या आता 2334 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे 101 जणांचा मृत्यू झाल्याची बाब आरोग्य विभागाने दिली आहे. 

महाराष्ट्राची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 352 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक 9 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतील मृतांची संख्या 100 वर पोहोचली आहे.   आतापर्यंत मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1549पर्यंत पोहोचली. राज्यात आज वाढ झालेल्या 352 रुग्णांपैकी 242 रुग्ण हे मुंबईतील आहेत.  पुण्यातही गेल्या 24 तासांत 39 रुग्ण आढळलेत.  राज्यात  कोरोना रूग्णांची संख्या कालपर्यंत 1982 इतकी होती ती आज 352 ने वाढून 2334 पर्यंत पोहोचली आहे.

43 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत 141 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई शहर हे रेड झोनमध्ये गेलं आहे. कारण महाराष्ट्रात मुंबई आणि त्यानंतर पुणे या दोन शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. 

14 एप्रिलनंतर देखील लॉकडाऊन कायम ठेवणार: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की, 14 एप्रिलनंतर देखील महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम असणार आहे. शनिवारी पंतप्रधान मोदींशी झालेल्या चर्चेतच मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं. 'राज्यातील मुंबई, पुणे आणि इतर काही शहरात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे कोरोनावर संपूर्ण मात करण्यासाठी हा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत आहे. म्हणजे किमान 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असेल. किमान मी अशासाठी म्हणतोय की, आपण जर या पुढील काळात कुठेही गर्दी केली नाही तरच आपण कोरोनाला नियंत्रणात आणू शकतो. म्हणून 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. 

14 एप्रिलनंतर देखील लॉकडाऊन कायम राहणार

शनिवारी संध्याकाळी 5 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन संदर्भात मोठी घोषणा केली. 'पंतप्रधान मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जेव्हा आमची बैठक झाली तेव्हा त्यांनी पहिल्यांदा मला बोलण्याची संधी दिली. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, 14 एप्रिलनंतर देखील मी महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम ठेवणार. किमान 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे.  किमान अशासाठी म्हणतो की, कुठेही गर्दी केली नाही अगदी भाजी मंडईमध्ये तरच कोरोना नियंत्रणात येईल आणि मग हा लॉकडाऊन आपण हटवू शकतो.' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, राज्यात यापुढेही लॉकडाऊन सुरु राहील.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी