विवेकानंदांनी दाखवलेल्या मार्गावर दोन पावले तरी चालण्याचा प्रयत्न करावा : राज्यपाल

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 31, 2022 | 19:11 IST

प्रत्येकाने विवेकानंदांनी दाखवलेल्या वाटेवर किमान दोन पावले तरी चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. 

try to walk at least two steps on the path shown by Vivekananda says Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari
विवेकानंदांनी दाखवलेल्या मार्गावर दोन पावले तरी चालण्याचा प्रयत्न करावा : राज्यपाल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • रामकृष्ण मिशन स्थापनेला १२५ वर्षे पूर्ण 
  • विवेकानंदांनी दाखवलेल्या मार्गावर दोन पावले तरी चालण्याचा प्रयत्न करावा : राज्यपाल
  • विवेकानंद यांनी जगाला भारतीय संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवले

Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari : मुंबई : स्वामी विवेकानंदांनी देशाला 'उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका' हे ध्येयवाक्य दिले. विवेकानंद यांना अभिप्रेत ध्येय गाठायला अनेक वर्षे लागू शकतील. प्रत्येकाला विवेकानंद किंवा शंकराचार्य होता येत नाही; परंतु प्रत्येकाने विवेकानंदांनी दाखवलेल्या वाटेवर किमान दोन पावले तरी चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच रामकृष्ण मिशनच्या स्थापनेला १२५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मुंबईच्या रामकृष्ण मिशनच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर, वांद्रे मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते.

अज्ञान अंधश्रद्धेत गुंतलेला देश ही भारताची प्रतिमा बदलवून विवेकानंद यांनी जगाला भारतीय संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवले. त्यांनी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून एक जागतिक सेवाभावी संघटना उभी केली.  मिशनने केवळ ध्यान-धारणा, पूजा पाठ यापुरते आले कार्य मर्यादित न राहता शाळा, महाविद्यालये व इस्पितळे निर्माण केली.  भारतीय तत्वज्ञानाला पाश्चात्य विज्ञानाची जोड दिल्यास जग खऱ्या अर्थाने सुखी, आनंदी होईल असे विवेकानंद यांनी सांगितल्याचे राज्यपालांनी नमूद केले. 

शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेला संबोधित करताना त्यांनी वापरलेले  'बंधूंनो आणि भगिनींनो' हे केवळ शब्द नव्हते तर  त्या संबोधनामध्ये मानवतेप्रती प्रेम व आपुलकीचा भाव ओतप्रोत भरला होता. विवेकानंदांनी भारतीय प्राचीन ज्ञान जगासमोर नव्या रीतीने मांडले असे त्यांनी सांगितले.  
     
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यपालांनी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आणि माँ शारदा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. यावेळी रामकृष्ण मिशन मुंबईचे अध्यक्ष सत्यदेवानंद यांनी स्वागतपर भाषण केले तर बेलूर मठ येथील सहायक महासचिव स्वामी सत्येशानंद यांनी 'मातृभूमीला पुनश्च समृद्ध आणि शक्तिशाली कसे बनवता येईल' या विषयावर मार्गदर्शन केले. 

रामकृष्ण मिशन मुंबईच्या आयोजन समितीचे अध्यक्ष एस एम दत्ता यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला स्वामी निखिलेश्वरानंद तसेच मिशनच्या देशातील विविध केंद्रांचे अध्यक्ष तसेच निमंत्रित उपस्थित होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी