राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर?

मुंबई
Updated Aug 21, 2019 | 01:31 IST

Udayanraje Bhosale: शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Udayanraje Bhosale
उदयनराजे भोसले (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर
  • मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मुंबईत भेट घेतल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसलेंचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केला. त्यानंतर आता उदयनराजेच भाजत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. उदयनराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केल्यास त्याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार हे निश्चित आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत भेट

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी सायंकाळी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश करण्याचं ठरवलं असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान उदयनराजे भोसले यांनी इतका मोठा निर्णय का घेतला? याची चर्चा सर्वत्र होत आहे.

खासदारकीचा राजीनामा देणार?

उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार आहेत. उदयनराजे भोसले हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश करणार आणि त्यानंतर पुन्हा भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचंही बोललं जात आहे. मात्र, अद्याप या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये.

उदयनराजेंनी फेसबुक पोस्टवर म्हटलं...

उदयनराजे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असताना मंगळवारी रात्रीच्या सुमारास उदयनराजेंनी फेसबुक पोस्ट केली. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्चातील पूरपरिस्थिती संदर्भात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पूरग्रस्त भागातील नागरिकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्याबाबत तसेच लवकरात लवकर पंचनामे करुन भरपाई मिळावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली'.

भाजपच्या मेगाभरतीत शिवेंद्रराजेंचा भाजप प्रवेश

काही दिवसांपूर्वी भाजपची मेगाभरती मुंबईत पार पडली. या मेगाभरतीमध्ये उदयनराजे भोसले यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केला. शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा झटका बसला होता. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे या दोन्ही भावांमधील राजकीय संघर्ष सर्वांनाच माहिती आहे. या दोन्ही बांधवांमध्ये शरद पवारांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात यश आलं नाही. अखेर शिवेंद्रराजे यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला.

रामराजे निंबाळकर भाजपच्या वाटेवर

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. रामराजे निंबाळकर यांचे सुद्धा शरद पवार यांच्यासोबत खूप चांगले आणि जवळचे संबंध आहेत. मात्र, उदयनराजे भोसले यांच्यासोबतच्या राजकीय वादानंतर रामराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...