छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

मुंबई
Updated Aug 25, 2019 | 12:45 IST

Uddhav Thackeray on Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशासंदर्भात उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना एक आश्वासनही दिलं आहे.

Chhagan_Bhujbal and Uddhav_Thackeray
छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरे 

थोडं पण कामाचं

  • छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर उद्धव ठाकरे बोलले
  • मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिलं आश्वासन
  • उद्धव ठाकरेंच्या आश्वासनामुळे छगन भुजबळांना शिवसेनेत नो एन्ट्री झाल्याचं स्पष्ट

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. शिवसेनेत गेल्या अनेक दिवसांपासून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे आणि त्यामुळे आता छगन भुजबळ यांची सुद्धा घरवापसी होणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र, आता या प्रश्नावर स्वत: उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं आहे.

छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसेनेतील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांचाच विरोद आहे. भुजबळ यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशामुळे नाखिसमधील शिवसेनेचे नेते, पदाधिकारी हे शनिवारी मुंबईत दाखल झाले. या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.

उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आश्वासन

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला त्रास आजही आमच्या लक्षात आहे आम्ही ते विसरलेलो नाहीये अशा भावना शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंसमोर व्यक्त केल्या. यावेळी 'छगन भुजबळांना शिवसेनेत घेणार नाही' असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे.

भुजबळांना नो-एन्ट्री?

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पुन्हा शिवसेनेत येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. छगन भुजबळांच्या शिवेसना प्रवेशाच्या चर्चेनंतर अनेक शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते नाराज होते. त्यासाठीच नाशिकमधील शिवसेनेचे नेते बबनराव घोलप यांच्या नेत्रृत्वाखाली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी शनिवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पण आता स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच छगन भुजबळ यांना पक्षात न घेण्याचं आश्वासन शिवसैनिकांना दिलं आहे त्यामुळे भुजबळांच्या पक्षप्रवेशाला नो एन्ट्री असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.

भुजबळांनी यापूर्वी केलं होतं खंडन

साधारणत: महिन्याभरापूर्वी देखील छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावेळी छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत या वृत्ताचं खंडन केलं होतं. तसेच शिवसेना प्रवेशाच्या निव्वळ अफवा असल्याचंही म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...