मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वसामान्यांसाठी घेतला मोठा निर्णय

मुंबई
Updated Dec 09, 2019 | 22:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

CM Uddhav Thackeray: महाराष्ट्र विकास आघाडीने राज्यात सत्ता स्थापन केली असून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हातात घेतली आहेत. नवं सरकार स्थापन झाल्यावर उद्धव ठाकरेंनी निर्णयांचा धडाका लावल्याचं दिसतय

uddhav thackeray cm maharashtra pothole free roads high technology road construction shiv sena marathi news
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वसामान्यांसाठी घेतला मोठा निर्णय  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यापासून निर्णयांचा धडाका लावला आहे. आता उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यात यावेत असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच पारंपरिक पद्धत वापरण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. कारण रस्त्यातील खड्ड्यांमुळे राज्यातील विविध भागांत अनेक अपघात झाले आहेत. या अपघातात अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने लवकरच खड्डेमुक्त रस्ते दिसतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात एकूण तीन लाख किलोमीटरचे रस्ते आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, ग्राणीम भागातील रस्त्यांचा समावेश आहे. या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नेहमीच पारंपारिक पद्धत वापरली जाते पण आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन रस्ते विकसित करावेत जेणेकरुन हे रस्ते दीर्घकाळ टिकतील तेसच त्यांचा दर्जा सुद्धा सुधारेल असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीत मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता, सचिव (रस्ते) सी. पी. जोशी आणि इतरही अधिकारी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, नव्या टेक्नोलॉजीचा वापर करुन राज्यात एक हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे नियोजन केलं आहे. जर्मन तंत्रज्ञान वापरुन ३ हजार किलोमीटर रस्त्यांच्या पृष्ठभागाचे मजबुतीकरण केलं जाणार आहे. यासोबतच कोकणातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील २५०० किलोमीटर रस्त्यांचं पोरस बिटूमन मिक्स ही पद्धत वापरुन डांबरीकरण केलं जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी