Exclusive : यामुळे अजूनही नाही CMOट्विटर हँडलवर उद्धव ठाकरेंचा फोटो... 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबरला शपथ घेतली, या घटनेला पाच दिवस झाले तरी मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर अजूनही नव्या मुख्यमंत्र्यांचा फोटो झळकला नाही, हे आहे कारण

uddhav thackeray cmo twitter handle devendra fadanvis change after some techical changes political news in marathi google newsstand
यामुळे अजूनही नाही CMOट्विटर हँडलवर उद्धव ठाकरेंचा फोटो...  

मुंबई :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबरला शपथ घेतली, या घटनेला पाच दिवस झाले तरी आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर अजूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो झळकला नाही. या मागे एक मोठे कारण समोर आले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ तारखेला आपला पदभार स्वीकारला. त्यापूर्वी CMOने ट्वीटर हँडलमध्ये बदल केला. त्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो हटवून मंत्रालयाचा फोटो टाकला. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या की अजूनही उद्धव ठाकरे यांचा फोटो या ट्विटर अकाउंटवर का झळकत नाही.  आज पाच दिवस झाले तरी हा फोटो बदलण्यात आलेला नाही, या संदर्भात टाइम्स नाऊ मराठीने शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांच्याशी संपर्क साधला. त्यांना या प्रकारबद्दल माहिती विचारली. 

 

 

याबाबत हर्षल प्रधान म्हणाले,  CMO ट्विटर हँडलवर अजूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो आला नाही. याचे एक कारण आहे. अजूनही या ट्विटर हँडलवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झालेले ट्विट दिसत आहेत. अशा परिस्थितीत हे सर्व ट्विट आर्काइव्ह करून ते सध्याच्या ट्विटर हँडलवरून हटवावे लागणार आहेत. यासाठी एक प्रक्रिया आवश्यक आहे. या संदर्भात ट्विटरशी संपर्क साधला आहे. ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तो पर्यंत विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकण्यात आलेला नाही. माजी मुख्यमंत्र्यांचे ट्वीट आर्काइव्ह झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो दिसू लागेल, असे प्रधान यांनी सांगितले. 

पीएमओ आणि राष्ट्रपतीच्या ट्विटर अकाऊंटबाबतही असेच झाले

२०१४ मध्ये केंद्रात सत्तांतर होऊन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ऐवजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी या ट्विटर अकाऊंटवरून मनमोहन सिंग यांचे ट्वीटचे अर्काइव्ह करून नरेंद्र मोदी यांचा फोटो झळकला होता. तसेच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांच्या जागी विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची निवड झाल्यावर प्रणवदांचे ट्वीट आर्काइव्ह करून रामनाथ कोविंद यांचा फोटो राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर झळकला होता. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी