बाळासाहेबांच्या 'त्या' निर्णयामुळे आज उद्धव ठाकरेंना मिळालं मुख्यमंत्रिपद!

मुंबई
रोहित गोळे
Updated Dec 03, 2019 | 15:35 IST

Balasaheb Thackeray: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काही निर्णयामुळेच आज उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद मिळालं आहे. या गोष्टीचा खुलासा स्वत: शरद पवार यांनी केला आहे.

uddhav thackeray gets chief minister post today because of balasaheb's three decision
बाळासाहेबांच्या 'त्या' निर्णयामुळे आज उद्धव ठाकरेंना मिळालं मुख्यमंत्रिपद!  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • बाळासाहेबांच्या तीन निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद
  • बाळासाहेबांच्या निर्णयांची शरद पवारांनी सोनिया गांधींना दिली आठवण
  • सोनिया गांधीच्या पाठिंब्यानंतरच उद्धव ठाकरेंना मिळालं मुख्यमंत्रिपद

मुंबई: राज्याचं सर्वोच्च पद म्हणजे मुख्यमंत्रीपद... या एका पदासाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात गेला महिनाभर सत्तासंघर्ष सुरु होता. भाजप आपलं मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नसल्याने अखेर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याने थेट सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रिपद देखील मिळालं. पण त्यासाठी शिवसेनेला प्रचंड संघर्ष करावा लागला. मात्र या संघर्षाबरोबरच भूतकाळात ज्या काही गोष्टी घडल्या होत्या त्या देखील कारणीभूत आहेत. उद्धव ठाकरेंना आज जे मुख्यमंत्रिपद मिळालं. ते बाळासाहेबांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते त्यामुळेच असं म्हणावं लागले. याबाबत स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खुलासा केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (सोमवार) एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टींचा त्यांनी उलगडा केला आहे. जेव्हा भाजप आणि शिवसेना मिळून सत्ता स्थापन करु शकली नाही तेव्हा शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससमोर सत्तास्थापनेचा प्रस्ताव मांडला. खरं तर राष्ट्रवादी सुरुवातीपासूनच यासाठी सकारात्मक होती. पण काँग्रेस नेतृत्त्वाच्या मनात काहीसा संभ्रम होता. त्यावेळी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. 

याविषयावर बरीच चर्चा झाल्यानंतर देखील सोनिया गांधी जेव्हा फारशा सकारात्मक असल्याचं दिसून आलं नाही तेव्हा पवारांनी त्यांना बाळासाहेबांनी काँग्रेससाठी काही निर्णय घेतले होते त्याची आठवण करुन दिली. 

पाहा बाळासाहेबांनी कोणते असे निर्णय घेतले होते की, सोनिया गांधी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद देण्यास तयार झाल्या: 

  1. जेव्हा देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे त्याला पाठिंबा दिला होता. त्यावेळी आणीबाणीला पाठिंबा देणारे तीनच लोक होते. ते म्हणजे विनोबा भावे, श्रीपाद डांगे आणि बाळासाहेब ठाकरे. पण एक संघटना म्हणून त्यावेळी बाळासाहेबांनी आणीबाणीला दिलेला पाठिंबा हा खूप मोठा होता. 
  2. दुसरी गोष्ट आणीबाणीनंतर महाराष्ट्रात ज्या निवडणुका झाल्या तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलं होतं की, मी या निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही. म्हणजेच त्यांनी त्यावेळी देखील त्यांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता. 
  3. तिसरी आणि शेवटची गोष्ट, सलग दोन राष्ट्रपती निवडणुकीत बाळासाहेबांनी प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना आपला पाठिंबा दिला होता. एनडीएमध्ये असताना देखील त्यावेळी बाळासाहेबांनी अशाप्रकारचा निर्णय घेतला होता.

बाळासाहेबांच्या या तीन निर्णयाची जाणीव ठेवत अखेर सोनिया गांधी यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आणि स्वत: उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत विराजमान झाले.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी