मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना (Coronavirus) बाधितांच्या संख्येत वाढ पहायला मिळत आहे. अमरावती (Amaravati), वर्धा (Wardha), यवतमाळ (Yavatmal)मध्ये स्थानिक प्रशासनाकडून अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेकडूनही (BMC) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्याअंतर्गत कुठल्याही निवासी इमारतीत ५ पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आढळल्यास इमारत प्रतिबंधित (सील) करण्यात येत आहे. तर पुण्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला असून शाळा, कॉलेजेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. त्याच दरम्यान आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आणि शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुढील आठ दिवसांत परिस्थिती पाहून लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "राज्यात लॉकडाऊन करायचा का? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. या प्रश्नाचं उत्तर मी पुढील आठ दिवस तुमच्याकडून घेणार. मी पाहणार ज्यांना लॉकडाऊन नको असेल ते नागरिक मास्क घालतील, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करतील आणि ज्यांंना लॉकडाऊन लावायचा असेल ते नियमांचे पालन करणार नाहीत."
अमरावतीलमध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोना विषाणूची साखळी मोडण्यासाठी अमरावती शहरासह अचलपूरमध्ये एका आठवड्याचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे.
अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, "अमरावती जिल्हा तसेच शहरामध्ये गत काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या लक्ष केंद्रित करुन कार्यवाही करावी. तसेच नागरिकांनी सुद्धा जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश आज घेतलेल्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले."
पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सोमवार (२२ फेब्रुवारी २०२१) पासून रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हॉटेल, बार रात्री ११ पर्यंतच सुरू राहतील. संचारबंदीत वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे या अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. तर शाळा कॉलेजेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाचे मुद्दे
अमरावती, वर्धा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाने कोरोना विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी कोरोना चाचणी, लक्षणे असलेल्लया व्यक्तीबाबत विलगीकरण, तसेच नियमांचे उल्लंघन कऱणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच शनिवारी (२० फेब्रुवारी २०२१) रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी (२२ फेब्रुवारी २०२१) सकाळी ८ वाजपेर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.