सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट दाखवूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट काय आहे, हे दाखवूया. कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने न्यायालयाचा अवमान करून सीमाभागात एक-एक पाऊल टाकत आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासन यापुढे पावले टाकेल.

uddhav thackeray on karnataka border issue
सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट दाखवूया – मुख्यमंत्री उद्धव 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट काय आहे, हे दाखवूया.
  • कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने न्यायालयाचा अवमान करून सीमाभागात एक-एक पाऊल टाकत आहे.
  • सर्वपक्षीयांची, सर्व नेत्यांची एकजूट करू या. सीमावासियांचा आक्रोश राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोहचविण्यासाठी प्रयत्न करू

मुंबई  :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट काय आहे, हे दाखवूया. कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने न्यायालयाचा अवमान करून सीमाभागात एक-एक पाऊल टाकत आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासन यापुढे पावले टाकेल. त्यासाठी सर्वपक्षीयांची, सर्व नेत्यांची एकजूट करू या. सीमावासियांचा आक्रोश राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोहचविण्यासाठी प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत देण्यात येणारी अधिस्वीकृती पत्रिका पहिल्यांदाच सीमा भागातील मराठी वृत्तपत्रांच्या दोन महिला संपादकाना मंजूर करण्यात आली आहे. या पत्रिकांचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते बेळगाव जिल्ह्यातील दैनिक वार्ताच्या संपादक श्रीमती क्रांती सुहास हुद्दार व दैनिक स्वतंत्र प्रगतीच्या संपादक श्रीमती बबिता राजेंद्र पोवार यांना वितरण करण्यात आले.

वर्षा निवासस्थान येथील समिती सभागृहात झालेल्या या समारंभास महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी स्थापन समन्वय समितीचे सदस्य सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयचे संचालक अजय अंबेकर, संचालक गोविंद अहंकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, नववर्षाची सुरुवात चांगल्या उपक्रमाने झाली आहे. पत्रकार दिनी आज सीमा भागातील मराठी वृत्तपत्राच्या दोन महिला संपादकांना राज्य शासनाची अधिस्वीकृती पत्रिका देवून सीमा लढ्याला बळ देण्याचा प्रयत्न आहे. सीमाभागातील माता भगिनींना न्याय मिळवून देण्याची आमची जिद्द आहे. या भागातील अन्यायाचा टाहो राज्यातील अन्य भागात पोहचविण्याची गरज आहे. गेली चौसष्ठ वर्षे हा लढा सुरु आहे. पण आता पिढ्या बदलल्या आहेत. त्यमुळे या प्रश्नाची दाहकता, या भागातील मराठी भाषिकांचा लोकांचा टाहो राज्याच्या अन्य जिल्ह्यात पोहचविण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. त्यामुळे सीमावासीय अन्यायाच्या विरोधात जे-जे पाऊल टाकतील, त्यासाठी सर्व ते सहकार्य केले जाईल.

कर्नाटक सरकार सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असतानाही एक-एक पाऊल टाकून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, या प्रश्नात एकजूट करण्यासाठी सर्वपक्षीय, सर्व नेत्यांनी आप-आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीतही आता एकी दिसत नाही. या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रय़त्न केला जाईल. ज्या पद्धतीने कर्नाटक सरकार पावले टाकत आहे. त्याचपद्धतीने महाराष्ट्र सरकारही पावले टाकेल. यातून महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची एकजूट काय आहे, हे दाखवू या.

सीमा लढ्याचा मला वारसा – मुख्यमंत्री

‘सीमा लढा माझ्या अंतरकरणाच्या जवळचा विषय आहे. आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सीमा लढ्याचा वसा आणि वारसा मला मिळाला आहे. या लढ्याशी आपले नाते आणि ऋणानुबंध दोन पिढ्याचे आहे,’ असा उल्लेखही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ म्हणाले, सीमा भागातील मराठी भाषिक वृत्तपत्र संपादकांना राज्य शासनाची अधिस्वीकृती पत्रिका देवून या लढ्यात राज्य शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. सीमा लढ्यात वृत्तपत्रांचे योगदान मोलाचे असून त्यांनी हा लढा जिवंत ठेवला  आहे. भाषा जिवंत राहिली तर लढा जिवंत राहील यासाठी सीमा भागात मराठी शाळा सुरु होणे गरजेचे आहे, असेही श्री.भुजबळ यांनी सांगितले.

मराठी भाषा मंत्री देसाई म्हणाले, मराठी भाषा विभागामार्फत सीमा भागातील मराठी शाळांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सीमा भागात  मराठी भाषा विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे यांनी सीमा लढ्यातील विविध आंदोलने तसेच तुरुंगवास अशा आठवणींना उजाळा दिला. सीमाभागातील मराठी पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, सीमा भागातील मराठी वृत्तपत्र संपादकांना अधिस्वीकृती पत्रिका देवून महासंचालनालयाने ऐतिहासिक काम केले आहे. सीमा लढ्यात पत्रकारांचा वाटा मोलाचा आहे. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी महासंचालनालयामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, तटकरे यांनी सांगितले.

यावेळी बेळगाव जिल्ह्यातील पत्रकारांच्यावतीने जेष्ठ पत्रकार मनोहर कालकुंद्रीकर यांच्यासह उपस्थितांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा सत्कार केला.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाने कार्यक्रमाचे संयोजन केले होते. कोल्हापूरचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी सूत्रसंचालन केले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी