'भाजपचा कुठलाही फोन 'मातोश्री'वर घेतला जाणार नाही', शिवसेना प्रचंड आक्रमक 

मुंबई
रोहित गोळे
Updated Nov 08, 2019 | 17:00 IST

भाजपने सत्तास्थापनेसाठी शेवटच्या प्रयत्न म्हणून लेखी मसुद्याचा प्रयत्नही करुन पाहिला मात्र, चर्चा फक्त मुख्यमंत्रीपदाबाबतच होईल, इतर कशावरही नाही. अशी ठाम भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली आहे. 

uddhav thackeray will not take the phone of any bjp leader shiv sena tremendously aggressive for cm post
'भाजपचा कुठलाही फोन 'मातोश्री'वर घेतला जाणार नाही', शिवसेना प्रचंड आक्रमक  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • भाजपच्या लेखी मसुद्यानंतरही शिवसेना आक्रमक
  • भाजपच्या कोणत्याही नेत्याचे फोन मातोश्रीवर घेतले जाणार नाही!
  • शिवसेना मुख्यमंत्रीपदाबाबत अद्यापही ठाम

मुंबई: राज्यात युतीची सत्ता स्थापन व्हावी यासाठी भाजपकडून प्रचंड प्रयतन सुरु आहे. शेवटच्या क्षणी कोंडी फुटावी यासाठी भाजपकडून एक लेखी मसुदा देखील तयार करण्यात आला आहे. या मसुद्यात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य मागे घेण्यात आलं असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील कोंडी फुटेल असा अंदाज वर्तवला जात होता. पण भाजपचे हे प्रयत्न देखील वाया जाणार असंच दिसतं आहे. कारण भाजपच्या या सगळ्या प्रयत्नांना शिवसेनेने  कोणतीही सकारात्मकता न दाखवता आपल्या भूमिकेवर ठाम राहणंच पसंत केलं आहे. 

शिवसेना सध्या मुख्यमंत्रीपदाबाबत अत्यंत आक्रमक असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे भाजपच्या लेखी मसुद्याकडे देखील शिवसेनेने दुर्लक्ष केलं आहे. यासोबतच खास सूत्रांकडून अशीही माहिती मिळते आहे की, 'भाजपच्या कोणत्याही नेत्याचा फोन 'मातोश्री'वर घेतला जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य मागे घेवो अथवा न घेवो याने फरक पडत नाही. भाजप जर मुख्यमंत्रीपद देण्यास तयार असेल तरच चर्चा होईल. मसुद्यात मुख्यमंत्रीपद हा शब्द नसेल तर काहीही चर्चा होणार नाही.' अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतलं असल्याचं समजतं आहे. 

दरम्यान, या मसुद्याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका मांडली आहे. या संदर्भात पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले, 'मसुद्याबाबत आम्हांला माहिती नाही. मसुदा वगैरे काही नको, मुख्यमंत्रिपदाबाबत बोला. मगच चर्चा होईल. ते पद देत असतील तर आम्ही चर्चा करू.' असे म्हणत जी सत्ता संघर्षाची कोंडी फुटण्याची चिन्ह असणारी बातमी दिली जात होती ती संजय राऊत यांनी निष्प्रभ करून टाकली. त्यामुळे शिवसेना आपल्या भूमिकेवर कायम ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 

दुसरीकडे काही वेळापूर्वीच भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी असं वक्तव्य केलं होतं. की, 'माझी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असं काहीही ठरलेलं नव्हतं. त्यामुळे राज्यातील सरकार हे देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली स्थापन होईल. तसंही ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला बाळासाहेब असल्यापासून आहे. त्यामुळे आता देखील भाजपाचाच आमदार होईल. जर गरज पडली तर मी शिवसेना आणि भाजप यांच्यात नक्कीच मध्यस्थी करेन.' असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी वक्तव्य केलं होतं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी