Uddhav Thackrey Vs Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटापासून बिघडले ठाकरे आणि शिंदेंचे संबंध, मुख्यमंत्र्यांनी का पाहिला नव्हता चित्रपटाचा शेवट?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यात दरी निर्माण होण्यास कारणीभूत ठरला तो धर्मवीर हा चित्रपट. या चित्रपटातील काही दृश्यांवरून उद्धव ठाकरे हे शिंदेंवर नाराज होते, अशी माहिती पक्षातील सूत्रांकडून समजते आहे.

Uddhav Thackrey Vs Eknath Shinde
धर्मवीर चित्रपटापासून बिघडले ठाकरे आणि शिंदेंचे संबंध  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • धर्मवीर चित्रपटापासून बिघडू लागले ठाकरे-शिंदे संबंध
  • चित्रपटातील राज ठाकरेंबाबतच्या दृश्यावर उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा
  • एकनाथ शिंदेंना त्यानंतर डावललं गेल्याचं निकटवर्तीयांचं निरीक्षण

Uddhav Thackrey Vs Eknath Shinde | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ नेते यांचे संबंध बिघडायला खरी सुरुवात झाली ती गेल्या महिन्यापासून, असं शिवसेनेतील सूत्रं सांगतात. या तणावाला कारण ठरलं आनंद दिघेंवरचा धर्मवीर हा चित्रपट. या चित्रपटात राज ठाकरे आणि नारायण राणे या दोन व्यक्तीरेखा ज्या प्रकारे रेखाटण्यात आल्या आहेत, त्या उद्धव ठाकरेंना पसंत नसल्याचं समोर आलं. या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे नाराज झाले आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंना पक्षाकडून महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत डावलण्यास सुरुवात झाली, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

काय होतो तो सीन?

या चित्रपटाच्या शेवटी एक दृश्य आहे. तत्कालीन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रुग्णशय्येवर पडलेल्या धर्मवीर आनंद दिघेंना भेटण्यासाठी येतात. धर्मवीर, हिंदुत्वाचं काम अजून बाकी आहे. असं अंथरुणाला खिळून कसं चालेल? असा सवाल ते दिघे यांना करतात. त्यावर दिघे राज ठाकरेंना उद्देशून ‘यापुढे हिंदुत्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर’ असं म्हणतात. राज ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यावर चित्रित झालेला हा प्रसंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुपला होता आणि त्यावरून ते एकनाथ शिेंदेवर नाराज होते, असं सांगितलं जातंय. 

अधिक वाचा - शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याशी शिंदे असा करतील सुरतेचा तह?

शेवट न पाहताच सोडला चित्रपट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी धर्मवीर चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. आनंद दिघे हे मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जातात आणि गणपतीचं दर्शन घेतात, असा एक सीन चित्रपटात दाखवण्यात आला आहे. हा सीन होईपर्यंतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट पाहिला. त्यानतंर ते तडक उठले आणि चित्रपटगृहातून बाहेर पडले. त्यानंतर राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचा सीन चित्रपटात दिसतो. तो पाहणे टाळण्यासाठीच मुख्यमंत्री बाहेर पडल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. अर्थात, आपल्याला दिघे साहेबांचा मृत्यू झाल्याचं पाहवलं नसतं, म्हणूनच आपण बाहेर पडलो, असं मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितलं होतं. 

अधिक वाचा - सत्तेचा प्रस्ताव कोण सोडेल, चंद्रकांतदादांचा सवाल

राज ठाकरे, नारायण राणेंना दाखवल्याने नाराजी

धर्मवीर चित्रपटात राज ठाकरे आणि नारायण राणे यांना दाखवण्यात आलं आहे. धर्मवीर आनंद दिघेंच्या अखेरच्या काळात हे दोन्ही नेते त्यांच्या संपर्कात होते. मात्र या गोष्टीमुळे उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेंवर नाराज होते. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीदरम्यान महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत एकनाथ शिंदेंना सहभागी करून न घेण्यामागेही हेच कारण असल्याची चर्चा आहे. आता ही नाराजी बाजूला ठेऊन उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंची समजूत काढतात की या दोन नेत्यांची मन कायमस्वरूपी दुभंगली जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी