राज्यपालांचे हस्ते झालेले चौकाचे नामांतर अनधिकृत?

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 30, 2022 | 16:13 IST

राज्यपालांच्या एका वक्तव्यामुळे मराठी विरुद्ध गुजराती-मारवाडी असा वाद राजकीय पातळीवर झाला. पण या वादाला सुरुवात ज्या चौकाच्या नामांतरामुळे झाली तो सोहळा अनधिकृत आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांचे म्हणणे आहे.

Unauthorized renaming of the square from hands of the governor of Maharashtra
राज्यपालांचे हस्ते झालेले चौकाचे नामांतर अनधिकृत?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • राज्यपालांचे हस्ते झालेले चौकाचे नामांतर अनधिकृत?
  • मनपाकडून चौकाच्या नामांतराला लेखी परवानगी होती का हा पहिला प्रश्न आहे
  • नामांतर कार्यक्रमाच्या फोटोत सुधीर मुनगंटीवार यांच्या नावापुढे राज्याचे कॅबिनेट मंत्री असा उल्लेख

Unauthorized renaming of the square from hands of the governor of Maharashtra : राज्यपालांच्या एका वक्तव्यामुळे मराठी विरुद्ध गुजराती-मारवाडी असा वाद राजकीय पातळीवर झाला. पण या वादाला सुरुवात ज्या चौकाच्या नामांतरामुळे झाली तो सोहळा अनधिकृत आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांचे म्हणणे आहे.

शहरात किंवा गावात एखाद्या चौकाचे अथवा रस्त्याचे नामांतर केले जाते त्यावेळी काही नियमांचे पालन केले जाते. या नियमांनुसार संबंधित चौक किंवा रस्ता कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत येतो हे महत्त्वाचे असते. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लेखी परवानगी नंतरच नामांतर होऊ शकते. राज्यपालांनी अंधेरीतील चौकाचे नामांतर केले, हा चौक मुंबई मनपाच्या हद्दीत येतो. यामुळे मनपाकडून चौकाच्या नामांतराला लेखी परवानगी होती का हा पहिला प्रश्न आहे. नामांतर सोहळ्याला स्थानिक नगरसेवक अध्यक्ष असतो आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी हे कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असतात. नामांतराचा कार्यक्रम स्थानिक वॉर्ड ऑफिसने करायचा असतो. पण राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला या नियमांचे पालन झाल्याचे दिसत नाही. नामफलक लावण्याची जबाबदारी पालिकेची असते. नामफलक किती मोठा असावा आणि कसा दिसावा यासाठीही निश्चित अशी नियमांची चौकट आहे. पण या नियमांच्या चौकटीचे उल्लंघन करून नामांतर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांचे म्हणणे आहे.

नामांतर कार्यक्रमाच्या फोटोत सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा उल्लेख नामफलकावर दिसत आहे. मुनगुंटीवार यांच्या नावापुढे राज्याचे कॅबिनेट मंत्री असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारभार करत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुनगंटीवार राज्याचे आमदार आहेत पण मंत्री नाही. मग नामफलकावर हा चुकीचा उल्लेख कसा झाला हा गंभीर प्रश्न आहे.

राज्यपाल हे घटनात्मकदृष्ट्या राज्याचे प्रथम नागरिक असतात. यामुळे त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात सरकारी नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे. पण अंधेरीतील चौकाच्या नामांतराच्या कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे; असे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांचे म्हणणे आहे.

राज्यपालांच्या वक्तव्यावरून वाद, राज्यपालांचे स्पष्टीकरण 

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांनी आपला पैसा काढून घेतला तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी उरणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या योगदानाचा गौरव केला आहे. मुंबई ही महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच आणि देशाची आर्थिक राजधानीदेखील आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या स्पष्टीकऱणात राज्यपाल म्हणतात, “छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला. काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही; असे राज्यपाल म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी