'वायू' चक्रीवादळाचा धोका, चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबईत पोलीस, NDRF टीम तैनात

मुंबई
Updated Jun 12, 2019 | 12:55 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Cyclone Vayu in Mumbai: ‘वायू’ चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकत असलं तरी मुंबईत त्याचा परिणाम जाणवतोय. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबई पोलीस दल आणि एनडीआरएफच्या टीम तैनात झाल्या आहेत.

vayu
'वायू' चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तटरक्षक दल, NDRF टीम तैनात  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: ‘वायू’ चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेनं सरकू लागलंय. मात्र, तरीही खबरदारी म्हणून मुंबई आणि कोकणात समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षेच्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत. राज्य पोलीस दल, तटरक्षक दल आणि NDRF च्या टीम कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी मुंबईत सज्ज झाल्या आहेत. गुजरातकडे सरकत असलेल्या वायू चक्रीवादळाचा परिणाम राज्यातही बघायला मिळतोय. बुधवारी दुपारनंतर वेगानं वारे वाहू शकतात. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, चक्रीवादळानं गुजरात तटावर धडक दिलीय. त्यामुळे सर्व किनारपट्टीवर सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

या चक्रीवादळाचा परिणाम मुंबई पोलीस चक्रीवादळाचा सामना कसा करावा, यासाठी स्थानिकांना सावधगिरीच्या सूचना देत आहेत. मुंबई पोलिसांनी शहारातील अनेक भागांमध्ये दुपारनंतर वेगानं वारे वाहू लागतील, त्यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नागरिकांना समुद्राजवळ न जाण्याचा सल्ला पोलिसांकडून दिला गेलाय. सोबतच समुद्रकिनाऱ्यांवरील संकटांचा सामना करण्यासाठी तटरक्षक दलानं परिसर रिकामा केला आहे. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे झाडं उन्मळून पडू शकतात. त्यामुळे जुन्या झाडांखाली वाहनं उभी न करण्याचा सल्लाही पोलिसांकडून देण्यात आलाय.

याशिवाय भारतीय तटरक्षक दलानं आपात्कालिन परिस्थितीसाठी आपली टीम तयार ठेवलीय. कुठल्याही प्रकारच्या संकटाचा सामना करण्यासाठी टीम पुरेपुर सज्ज आहे. दमन, मुंबई, रत्नागिरी, गोवा, करवार, मँगलोर, डहाणू आणि कोच्चीमध्ये तटरक्षक दलाच्या टीम तैनात झाल्या आहेत.

दरम्यान, गुजरातच्या पोरबंदर आणि महुआ इथं १३ जून रोजी सकाळी ‘वायू’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या दरम्यान ताशी १५० ते १७० किलोमीटर वेगानं वारे वाहतील, असा अंदाज व्यक्त केला गेलाय. या दरम्यान, गुजरातच्या किनारपट्टीवर नवलखी, मोरबी, कांडला पोर्ट आणि गांधीधाम जिल्ह्यातील किनारपट्टीचा परिसर रिकामा करण्यात आला आहे.

तसंच गुजरात सरकारनं हाय अलर्ट जारी केला असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या असून सगळ्यांना परिसरातील पाहणी आणि सुरक्षेच्या कामी लावलंय.

ओडिशामध्ये नुकत्याच येऊन गेलेल्या फनी वादळामध्ये तिथल्या सरकारनं कोणत्या उपाययोजना आणि खबरदारी घेतली, याची माहिती गुजरात सरकार घेतंय. त्यानुसार सर्व तयारी करण्यात येतेय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी