अवघ्या १० रुपयांच्या वादावरून भाजी विक्रेत्यानं केली ग्राहकाची हत्या

मुंबई
Updated Jun 25, 2019 | 18:26 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

मुंबईत एक धक्कादायक घटना घडलीय. एका भाजी विक्रेत्यानं ग्राहकाची हत्या केलीय. या हत्येमागचं कारण म्हणजे १० रुपयांवरून झालेला वाद असल्याचं कळतंय. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Murder
भाजीविक्रेत्यानं केली ग्राहकाची हत्या  |  फोटो सौजन्य: Representative Image

मुंबई: दादर रेल्वे स्टेशनबाहेर सोमवारी रात्री एक धक्कादायक प्रकार घडला. तुम्ही म्हणाल एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याची किंमत किती असेल, पण अवघ्या १० रुपयांसाठी दादर रेल्वे स्टेशनबाहेरील एका भाजी विक्रेत्यानं ग्राहकाचा खून केलाय. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना आहे. मोहम्मद हनीफ असं मृत ग्राहकाचं नाव आहे. सोनीलाल नावाच्या भाजी विक्रेत्यानं १० रुपयांच्या झालेल्या वादावरून हनीफ याला चाकून भोसकून ठार केलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार मोहम्मद हनीफ भाजी घेण्यासाठी रात्री ११ च्या सुमारास दादर रेल्वे स्टेशनबाहेर आला होता. त्यावेळी त्याच्यात आणि भाजी विक्रेत्यामध्ये १० रुपयांवरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की भाजी विक्रेत्यानं आपल्या जवळ असलेल्या चाकून हनीफ याच्यावर वार केले आणि त्याची हत्या केली. घटनेनंतर भाजीविक्रेत्या सोनीलालनं तिथून पळ काढला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्क पोलिसांना घटनेसंबंधी माहिती मिळताच ते लगेच तिथं पोहोचले. त्यांनी मोहम्मद हनीफ याला केईएम रुग्णालयात नेलं. पण तिथं पोहोचल्यावर डॉक्टरांनी हनीफ याला मृत घोषित केलं. शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचताच तिथं असलेल्या इतर भाजी विक्रेत्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरूवात केली. मात्र एका क्षुल्लक कारणामुळे ग्राहकाला आपला जीव गमवावा लागला.

दरम्यान, फरार झालेल्या भाजी विक्रेत्याचा रात्रभर शिवाजी पार्क पोलिसांनी शोध घेतला. मंगळवारी सकाळी त्याला शोधण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी भाजीविक्रेता सोनीलालला अटक केली आहे.

 

 

दादरच्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील गावकर यांनी सांगितलं, ‘आम्हाला जशी या घटनेची माहिती मिळाली, आम्ही लगेच घटनास्थळी पोहोचलो. गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद हनीफ यांना रुग्णालयात दाखल केलं. पण उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.’

भाजीविक्रेत्या सोनीलालनं मोहम्मद हनीफ यांच्यावर खूप गंभीर हल्ला केला होता. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी त्यानं चाकूनं वार केले होते. अशाप्रकारच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

१० रुपये हे काही हत्या करण्यासाठीचं कारण झालं का? असं आपल्याला वाटेल पण अशाच प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आपण पाहू शकतो. यात अवघ्या १० रुपयांसाठी कुणाची हत्या तर कुणाचं अपहरण केलं गेलं आहे. ही मानसिकता समाजासाठी चांगली नाही. या मानसिकतेमागच्या कारणांचा शोध घेणं आणि त्यावर उपाययोजना करणं खूपच गरजेचं झालेलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अवघ्या १० रुपयांच्या वादावरून भाजी विक्रेत्यानं केली ग्राहकाची हत्या Description: मुंबईत एक धक्कादायक घटना घडलीय. एका भाजी विक्रेत्यानं ग्राहकाची हत्या केलीय. या हत्येमागचं कारण म्हणजे १० रुपयांवरून झालेला वाद असल्याचं कळतंय. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Loading...
Loading...
Loading...