दहावी, बारावीच्या परीक्षा जाहीर, अंधांचे प्रश्न अनुत्तरित

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 08, 2021 | 22:29 IST

दहावी आणि बारावीच्या परीक्षा जवळ आल्या तरी अंध विद्यार्थ्यांचे प्रश्न अनुत्तरित आहेत.

Vice President of BJP Maharashtra Chitra Kishor Wagh raised blind students issues
दहावी, बारावीच्या परीक्षा जाहीर, अंधांचे प्रश्न अनुत्तरित 

थोडं पण कामाचं

  • दहावी, बारावीच्या परीक्षा जाहीर, अंधांचे प्रश्न अनुत्तरित
  • अंध विद्यार्थ्यांच्या लेखनिकाचा प्रश्न
  • विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचा प्रश्न

मुंबईः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी दहावी आणि बारावी या इयत्तांसाठीच्या ऑफलाइन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. कोविड प्रोटोकॉल पाळून परीक्षा होतील, असे राज्य शासन सांगत आहे. पण परीक्षा जवळ आल्या तरी अंध विद्यार्थ्यांचे प्रश्न अनुत्तरित आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे आणि ते तातडीने सोडवावे; अशी मागणी राज्य भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. Vice President of BJP Maharashtra Chitra Kishor Wagh raised blind students issues

दरवेळी अंध विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी लेखनिक सहाय्य करतात. यासाठी अनेकदा नववी किंवा त्यापेक्षा खालच्या इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लेखनिक केले जाते. लेखनिक प्रश्न वाचून सांगतो आणि अंध विद्यार्थ्याने तोंडी दिलेले उत्तर उत्तरपत्रिकेत लिहितो. या प्रक्रियेतील वेळ विचारात घेऊन अंध विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत पेपर सोडवण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ दिला जातो. पण कोरोना संकटामुळे पहिली ते नववीची शाळा बंद आहे. मुलांना सरसकट वरच्या इयत्तेत प्रवेश देण्यात आला आहे. यामुळे अंध विद्यार्थ्यांना लेखनिक सहाय्य करण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १८ मार्च २०२१ रोजी झालेल्या झूम बैठकीत लेखनिकांचा प्रश्न लवकरच सोडवू असे सांगितले होते. प्रत्यक्षात उलट परिस्थिती आहे. लेखनिकांचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वेबसाइटवर दहावी आणि बारावी या इयत्तांसाठीच्या ऑफलाइन परीक्षांचे वेळापत्रक आहे. पण लेखनिक संदर्भात माहिती देणारी किंवा मदत करणारी लिंक वा मजकूर दिसत नाही. 

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शहरांमध्ये समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहात राहून शिक्षण घेतात. पण वसतीगृह बंद आहे. यामुळे ऑफलाइन परीक्षेसाठी शहरा आल्यावर ग्रामीण भागातील मुले कुठे राहणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. ग्रामीण भागातील अंध विद्यार्थ्यांसाठी तर वास्तव्य आणि लेखनिक असे दोन गंभीर प्रश्न आहेत ज्यांचे उत्तर त्यांना अद्याप मिळालेले नाही. 

विद्यार्थी शहरी भागातील असो वा ग्रामीण भागातील त्याला घराजवळचे परीक्षा केंद्र मिळावे. एखाद्या विद्यार्थ्याने फॉर्म भरला त्यावेळचा पत्ता आणि त्याचा किंवा तिचा सध्याचा राहण्याचा पत्ता वेगळा असल्यास सध्याच्या घराजवळचे परीक्षा केंद्र द्यावे. यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेआधी एकदा परीक्षा केंद्र बदलण्यासाठी अर्ज करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. कोरोना संकटामुळे झालेल्या विस्थापनाचा विचार करता ही व्यवस्था आवश्यक आहे. पण परीक्षा केंद्र बदलण्याची सोय उपलब्ध झालेली नाही. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याबाबतची प्रक्रिया आणि नियम माहिती नाही. 

झूम बैठकीत विद्यार्थ्यांना दिलेल्या अनेक नंबरवर कॉल केल्यास कोणीही फोन उचलत नाही यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असल्याचे चित्र वाघ म्हणाल्या. त्यांनी विद्यार्थ्यांचे अनुत्तरित प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडे केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी