मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेसाठी काही तास शिल्लक असताना भारतीय जनता पक्षाने निवडून आलेल्या आपल्या सर्व १०५ आमदार आणि पाठिंबा देणाऱ्या १० अपक्ष आमदारांना तातडीने मुंबईत बोलावले आहे. सत्ता स्थापनेसंदर्भात निर्णय घेतल्यास सर्व आमदार एकाच ठिकाणी असले पाहिजे यासाठी भाजपने तातडीने हे पाऊल उचलले आहे.
राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी उद्या दि. ८ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंतचा वेळ आहे. तसे झाले नाही तर सध्याचे काळजीवाहू सरकार बरखास्त होऊन राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. त्यामुळे जर भाजपला शिवसेनेला पाठिंबा दिला किंवा अल्पमतातील सरकार स्थापन करायचे असेल तर सर्व आमदार एकत्र हवे यासाठी भाजपने हे पाऊस उचलले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यभरातील सर्व भाजपच्या आमदारांना आज सायंकाळ किंवा रात्रीपर्यंत मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील काही आमदार मुंबईत दाखलही झाले असून मुंबईपासून दूर असलेल्या आमदार येत्या काही तासांत मुंबईत दाखल होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
यापूर्वी शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांची बैठक आज मातोश्रीवर घेतली. त्यानंतर बाहेर गावाहून आलेल्या आमदारांना रंगशारदा येथे राहण्याची व्यवस्था केली. तर मुंबईतील आमदार घरी जाऊ शकतात असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता, सर्व आमदार एकत्र राहावे, यासाठी शिवसेनेने ही भूमिका घेतली आहे.