सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे आहेत ५ पर्याय 

मुंबई
Updated Nov 09, 2019 | 22:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

. अशा परिस्थितीत भाजपने सत्ता स्थापन करायची ठरवली आणि बहुमत सिद्ध करायचे झाले तर पाच पर्याय भाजपकडेही उपलब्ध आहेत. 

vidhansabha election 2019 five option in front of bjp for govt formation maharashtra news in marathi
सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे आहेत ५ पर्याय   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापन करणार का अशी विचारणा केली आहे. या संदर्भात त्यांना येत्या ११ तारखेपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितली आहे. अशा परिस्थितीत सत्ता स्थापन करायची की नाही याचा उद्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. अशा परिस्थितीत भाजपने सत्ता स्थापन करायची ठरवली आणि बहुमत सिद्ध करायचे झाले तर पाच पर्याय भाजपकडेही उपलब्ध आहेत. 

राज्यातील निवडणुकांत भाजप हा १०५ आमदारासह पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला आहे. परंतु, सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले १४५ आमदारांचे पाठबळ त्यांच्याकडे सध्या नाही. अपक्षांच्या मदतीने ही संख्या १२० च्या घरात जाऊ शकते. त्यामुळे त्यांना अजून २५ आमदारांची गरज आहे. राज्यातील निवडणुका भाजप-सेना आणि मित्र पक्षांनी महायुती म्हणून लढले. परंतु, शिवसेना सत्तेचे समसमान वाटप करण्याचा मुद्द्यावरून अडून बसली त्यामुळे १४५ची मॅजीक फिगर गाठण्यात भाजपला अपयश आले आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. 

जाणून घेऊया कोणते आहेत ते पाच पर्याय... 

  1. भाजपने सत्ता स्थापनेची तयारी दाखवली आणि राज्यपालांना तसे कळवले तर फडणवीस शपथ घेऊन मुख्यमंत्री बनू शकतात.  त्यांनी शिवसेनेची पुन्हा मनधरणी करून पाठिंबा देण्यास सांगितले तर सत्ता समिकरण जुळु शकते. अजूनही युती तुटली नाही, त्यामुळे भाजप पुन्हा सेनेच्या पाठिंबा घेण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि पुन्हा राज्यात युतीचे सरकार स्थापन होऊ शकते. 
  2. दुसरा पर्याय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४ आमदारांचे बळ आहे. अशा परिस्थिती मतदानावेळी राष्ट्रवादीचे ५४ आमदार गैरहजर झाले तर गणसंख्या २३४ होईल. अशा परिस्थिती बहुमत सिद्ध करण्यासाठी ११८ आमदारांची गरज पडणार आहे. भाजपकडे अपक्षांच्या मदतीने १२० आमदारांचा पाठिंबा आहे. सरकार बहुमत सिद्ध करू शकते. 
  3. तिसरा पर्याय म्हणजे २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेसने न मागता भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे असाच पाठिंबा पुन्हा राष्ट्रवादीने दिला तर भाजप बहुमत सिद्ध् करू शकते आणि भाजप १२० आणि राष्ट्रवादी ५४ अशी बेरीज १७४ होईल आणि बहुमत सिद्ध होईल. 
  4. चौथा पर्याय हा फोडाफोडीचा आहे. यात भाजपला आवश्यक असलेल्या २५ आमदारांचा पाठिंबा हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यापैकी २५ किंवा त्या पेक्षा अधिक आमदारांना फोडून मिळू शकतो. त्यांनी पाठिंबा दिला तर भाजप बहुमत सिद्ध करू शकते. अशा परिस्थितीत भाजप १२० आणि शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या २५ आमदारांनी अशी मॅजिक फिगर १४५ होऊ शकते. 
  5. पाचवा पर्याय हा देखील फोडाफोडीचा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील २५ आमदारांचा एक गट तयार करून त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यास ते भाजप बहुमत सिद्ध करू शकतो. 

पण चौथा आणि पाचवा पर्याय भाजप करणार का हे पाहणे पुढील काही दिवसात औत्सुक्याचे राहणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आम्ही आमदार फोडून सराकर बनविणार नाही. असे जाहीर केले होते. पण सत्तेसाठी काही पण असे ठरवले तर गोवा, मणीपूर, कर्नाटक याची पुनरावृत्ती होऊ शकते आणि पुन्हा घोडेबाजार आणि नाट्यमय घडामोडींना महाराष्ट्राने तयार राहावे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...