मेट्रो मराठी माणसाचा घात करेल, एके दिवशी तुम्ही सरकत-सरकत उझबेकिस्तानला जाल: राज ठाकरे

मुंबई
रोहित गोळे
Updated Oct 17, 2019 | 21:11 IST

Raj Thackeray Prabhadevi Rally: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज मुंबईतच दोन सभा होणार आहेत. या दोन्ही सभा या दादर आणि परिसरात असल्याने या सभांमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

vidhansabha election 2019 mns chief raj thackeray prabhadevi mumbai rally full speech 
LIVE: राज ठाकरे यांची मुंबईतील प्रभादेवीमध्ये सभा  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

 • निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी मांडला पुन्हा परप्रांतीयांचा मुद्दा
 • मेट्रोमुळे मुंबईतील मराठी माणसाचा घात होईल: राज ठाकरे
 • आरेच्या वृक्षतोडीवरुन राज ठाकरेंची सरकारवर तुफान टीका

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे दोन दिवस उरलेले असताना राज ठाकरे यांनी आज (१७ ऑक्टोबर) मुंबईतील प्रभादेवीमध्ये तुफानी फटकेबाजी केली. यावेळी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा मतदारांसमोर मांडला. 'आज मराठी माणूस मुंबईतूनच काय तर कल्याण-डोंबिवलीमधून देखील हद्दपार होत चालला आहे. मुंबईतील अनेक डेपो बिल्डरांच्या घशात घालणं सुरु आहे. अशावेळी मराठी माणसं मुंबईतून बाहेर पडतात मग मुंबई सोडून कल्याण-डोंबिवलीला जातात. तिथेही आता जागा उरलेल्या नाहीत. त्यामुळे त्याच्याही पुढे तुम्ही आता जात आहात. एके दिवशी सरकत-सरकत उझबेकिस्तानला जाल.' अशा शब्दात राज ठाकरेंनी परप्रांतीयांच्या मुद्द्यावर आपली मतं व्यक्त केली. 

'मुंबईतील मेट्रोच मराठी माणसाचा घात करेल'

याचवेळी राज ठाकरेंनी मुंबईतील मेट्रोविषयी देखील राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 'माझा विकासाला कधीही विरोध नसतो. विरोधाला विरोध मी कधीच करत नाही. पण तुम्हाला सांगतो, मुंबईतील मेट्रो हिच मराठी माणसाचा घात करणार आहे. कारण मेट्रोमुळे जागांचे भाव वाढणार जे आपल्या हाताबाहेर जातील. त्यामुळे नालाजास्तव तुम्हाला मुंबईतून बाहेर पडावं लागेल आणि परप्रांतीयांची संख्या इथे वाढेल. त्यामुळे आता मुंबईची भाषा देखील बदलत चालली आहे.' असं म्हणत राज ठाकरेंनी मुंबई मेट्रोला देखील आपला विरोध दर्शवला आहे.  

'हे खुनी रामन राघव सरकार आहे'

दुसरीकडे याच भाषणात राज ठाकरेंनी सरकारला खुनी रामन राघव सरकार म्हणून संबोधलं आहे. आरेच्या मुद्द्यावरुन त्यांनी ही टीका केली. 'आपल्या हिंदू संस्कृतीत लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की, रात्रीच्या वेळी झाडा-फुलांना हात लावू नये. पण या सरकारने भर रात्री २००० हून अधिक झाडं छाटून टाकली. यावेळी मला असं जाणवलं की, हे सरकार म्हणजे खुनी रामन राघव आहे. तो कसा रात्री लोकांच्या डोक्यात दगड टाकून हत्या करायचा तसंच काहीसं या सरकारने आरेबाबत केलं आहे.' अशा शब्दात राज ठाकरेंनी आपला आरेच्या वृक्षतोडीविषयी निषेध व्यक्त केला. 

दरम्यान राज ठाकरे यांच्या दोन सभा आज मुंबईत आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिली सभा ही प्रभादेवी आणि दुसरी सभा ही लालबाग येथे आहे. 

पाहा राज ठाकरे यांची प्रभादेवीमधील सभा : 

राज ठाकरे यांच्या प्रभादेवी येथील सभेतील महत्त्वाचे मुद्दे

 1. तुमचा राग मनात दाबू नका, महाराष्ट्रात सक्षम विरोध पक्ष हवा आहे. त्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. 
 2. शिवसेनेची होर्डिंग लागली आहेत. 'हीच ती वेळ' मग पाच वर्ष तुम्हाला वेळ नव्हता? 
 3. महाराजांचे धडे वगळतात तरी आपण थंड बसलो आहोत. 
 4. ते विनोद तावडे आता घरी बसले आहेत. त्यांना महाराजांचा शाप लागला असले. 
 5. महाराष्ट्र राज्याचं आंतरराष्ट्रीय बोर्ड काढलं. त्यातून महाराजांचे धडे वगळले, ते विनोद तावडेंनी केलं. 
 6. आरेच्याबाबतीत मला वाटतं की, हे सरकार खुनी रामन राघव आहे. 
 7. उद्योगपतीला फायदा व्हावा यासाठी आरेमध्ये मेट्रो कारशेड उभा केला जात आहे.  
 8. मेट्रोमुळे जागांचे भाव वाढणार. हे भाव आपल्या हाताच्या बाहेर जाणार  
 9. माझा विकासाला विरोध नसतो, पण मुंबईत हीच मेट्रो मराठी माणसाचा घात करणार 
 10. मुंबईची भाषा आता बदलत चालली आहे. 
 11. तुम्ही मुंबईतून बाहेर पडता, परप्रांतीय मुंबईत येत आहेत. 
 12. एके दिवशी सरकत-सरकत उझबेगिस्तानला जाल तुम्ही
 13. तिथेही आता जागा उरलेल्या नाहीत. त्यामुळे त्याच्याही पुढे जाता 
 14. मुंबईतून बाहेर पडता, मग मुंबई सोडून कल्याण-डोंबिवलीला जातात 
 15. मुंबईतील अनेक डेपो बिल्डरांच्या घशात घालणं सुरु आहे. 
 16. ​खड्डेमय रस्ते तरीही तुमच्याकडून टोल वसुली सुरूच आहे. 
 17. सेना-भाजपच्या हातातील सत्ता गेल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही 
 18. कल्याण-डोंबिवलीत सुशिक्षत लोकं राहतात, पण महापालिकांमुळे ही शहरं बकाल झाली आहेत. 
 19. सरकार सत्तेत आलं त्यांनी सर्व टोलनाके बंद करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण आजही टोल सुरु आहेत. 
 20. पण माझ्या मनसैनिकांमुळे ७८ टोलनाके बंद झाले 
 21. पत्रकार मला विचारतात टोल नाक्यांच्या आंदोलनाचं काय झालं? 
 22. पेट्रोल-डिझेलवर सर्वाधिक करवसुली महाराष्ट्रातून 
 23. भारत पेट्रोलियम कंपनीच्या खासगीकरणाचा डाव सुरु आहे.
 24. मंदीचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसणार आहे. हे स्वत: डॉ. मनमोहन सिंह यांनी सांगितलं. 
 25. महाराष्ट्रात ५ लाख उद्योग बंद पडले, अर्थमंत्री सीतारामन यांनी कबुली दिली आहे. 
 26. २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. हे मोदी सरकार देशाला कुठे घेऊन जाणार आहे हे देवच जाणे 
 27. आपण सध्या रशियाच्या मार्गावर चाललो आहोत. तिथे फक्त १३-१५ लोकं देश चालवतात. तसंच आपल्याकडे देखील सुरु झालं आहे. 
 28. आपण फक्त निवडणुकांमध्ये मश्गुल आहोत. 
 29. राज ठाकरे यांची सभा सुरु 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी