मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असून त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना आणि भाजपच्या पालकमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत कोणत्याही राजकीय चर्चा झाल्या नसल्याचे शिवसेना आणि भाजप नेत्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना अतीवृष्टीमुळे झालेले नुकसानासंदर्भात चर्चा करण्यासाठी पालक मंत्र्यांची ही बैठक घेण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी आलो असल्याचे शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी बैठकीनंतर सांगितले. शेतकऱ्यांचा जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला असताना शिवसेना या बैठकीला आली नाही असे कोणी म्हणून नये त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.
राज्यातील ६० लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मदत मिळावी ही उद्धव ठाकरे यांनी केली मागणी आहे, ती मान्य करण्याचे आश्वासन आत्ताचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दिला असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.
काळजीवाहू सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना जाहीर केलेली १० हजार कोटी रुपयांची मदत ही अत्यल्प आहे. तातडीने १७ हजार कोटींची किंवा त्यापेक्षा अधिकची मदत करण्याची मागणी शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी केली आहे. त्यावर विचार करून निर्णय घेऊन असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.
सरकारने सध्या शेतात पाणी आहे, तसेच चिखल झाला आहे. अशा परिस्थितीत शेत सुकल्याशिवाय रब्बी पिके घेता येणार नाही. त्यामुळे त्या संदर्भातही उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीच्या मच्छीमार आणि भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक मच्छीमारांच्या बोटींचे नुकासन झाले आहे. त्यांना तातडीने मदत करण्याची मागणी सेनेने केली आहे.
सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये त्यामुळे दोन हेक्टरची मर्यादा न लावता सरसकट मदत मिळावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली असल्याचे शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच विमा कंपन्यांनी ताठर भूमिका न ठेवता तलाठी किंवा तहसीलदारांनी केलेल्या पंचनाम्यांना ग्राह्य धरावे. तसेच कोल्हापुरात शेतीच्या झालेल्या नुकसानीवेळी मनरेगाच्या माध्यमातून नष्ट झालेले पीक काढण्याचे काम करण्यात आले होते. तसेच काम सध्या राज्यातही मनरेगाच्या पैशातून पावसाने नुकसान झालेले पीक काढण्यात यावी अशी मागणीही करण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.