सत्ता वाटपाच्या फॉर्म्युलांच्या बातम्यांमागील सत्य 

राज्यातील सत्ता स्थापनेचे नवीन गणित निर्माण होत असताना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या सत्तेच्या वाटपाच्या फॉर्म्युल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. त्या बातमी येण्यामागे एक मोठं कारण आहे.

vidhansabha election 2019 shiv sena congress ncp govt formation of maharashtra truth behind news in marathi
सत्ता वाटपाच्या फॉर्म्युलांच्या बातम्यांमागील सत्य   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • माध्यमांमध्ये सुरू झाले सत्ता वाटपाचे फॉर्म्युले
  • ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात होऊ नये म्हणून तीनही पक्षातून घेतली जातेय खबरदारी
  • आमदारांना दिलासा देण्यासाठी पेरल्या जात आहेत बातम्या

मुंबई : राज्यातील सत्ता स्थापनेचे नवीन गणित निर्माण होत असताना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या सत्तेच्या वाटपाच्या फॉर्म्युल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. त्या बातमी येण्यामागे एक मोठं कारण आहे. ते म्हणजे आपल्या पक्षातील कोणताही आमदार फुटू नये, हा या तीनही पक्षांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता या पुढील काळात तीनही पक्षात चर्चा सुरू असले आणि असे फॉर्म्युले आगामी काळात मीडियामधून ऐकायला मिळणार आहेत. 

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आता चर्चेला सुरूवात झाली आहे. पण ही चर्चा सुरू होण्यापूर्वीच सत्ता वाटपाचा पहिला फॉर्म्युला समोर आला आहे. यानुसार मुख्यमंत्रीपद हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अडीच अडीच वर्ष वाटून घेण्यात येणार आहे. तर काँग्रेसला पुढील पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे. तसेच हे सत्ता वाटप हे समसमान होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. यात प्रत्येक पक्षाला प्रत्येकी १४ खाती मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. भाजपच्या गळाला आपल्या पक्षातील कोणताही आमदार लागू नये, राज्यात 'ऑपरेशन लोटस' करण्यास भाजपला वाव मिळू नये यासाठी तीनही पक्षांनी अशा पद्धतीने सत्ता वाटपाच्या बातम्या पसरविण्यात येत आहे. कर्नाटकात असे 'ऑपरेशन लोटस' झाले होते. यात काँग्रेसचे १४ आणि जेडीएसचे ३ आमदार फुटले होते.  यात प्रत्येक पक्षाचा स्वार्थही असतो. मीडियामध्ये अशा बातम्या पसरवून वाटाघाटीत समोरच्या पक्षांवर दबाव टाकण्याचा हा प्रकार असतो. त्यामुळे प्रत्यक्षात अशा प्रकारचा फॉर्म्युला ठरला असण्याची शक्यता फार कमी आहे.  तीनही पक्षांची चर्चा वेगळ्या पातळीवर सुरू असण्याची शक्यता अधिक आहे. 

सुरूवातीला संभाव्य महाशिवआघाडीत चर्चा ही किमान समान कार्यक्रमावर होणार आहे. शिवसेनेने आपले काही मुद्दे बाजूला ठेऊन तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपले काही मुद्दे बाजूला ठेऊन एका समान कार्यक्रमावर आपण काम करू शकतो का यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे सत्ता वाटपाची चर्चा या किमान समान कार्यक्रमानंतर होणार असल्याचे काँग्रेसच्या एका वरीष्ठ नेत्याने सांगितले.  

दरम्यान, सत्ता वाटपाची खरी चर्चा ही किमान समान कार्यक्रमावर एकमत झाल्यावर सुरू होणार आहे.  तीनही पक्षांचे नेते किमान समान कार्यक्रमासाठी समिती स्थापन करून ती समिती आपला अहवाल देईल, तो अहवाल सर्वांनी मान्य केल्यावरच सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू होतील.  सत्ता वाटपाचे सूत्र हे जिंकलेल्या जागांवरून होऊ शकते. तसेच कोणत्या पक्षाला किती अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे, त्यावरूनही ठरू शकते. त्यामुळे आता येणाऱ्या सत्ता वाटपाच्या बातम्या या आमदारांना आपल्याकडे ठेवण्यासाठी माध्यमांमध्ये पेरल्या जात असल्याचे एका राजकीय विश्लेषकाने सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी